५० किलो प्लास्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 01:37 AM2018-06-27T01:37:42+5:302018-06-27T01:38:03+5:30
नगर परिषदेच्या पथकाने गडचिरोली शहरातील दुकानांमध्ये मंगळवारी धाड टाकून बंदी असलेले सुमारे ५० किलो प्लास्टिक जप्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नगर परिषदेच्या पथकाने गडचिरोली शहरातील दुकानांमध्ये मंगळवारी धाड टाकून बंदी असलेले सुमारे ५० किलो प्लास्टिक जप्त केले आहे.
प्लास्टिकचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन राज्य शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची प्लास्टिक व इतर काही प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घातली आहे. ही बंदी २३ जूनपासून लागू करण्यात आली. गडचिरोली नगर परिषदेने प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यास सोमवारपासून सुरुवात केली आहे. सोमवारी पहिल्या दिवशी शहरातील काही दुकानांना प्लास्टिक बंदीबाबतचे नोटीस चिपकविले. त्यानंतर मंगळवारपासून नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या पथकाने कारवाईस सुरुवात केली. मंगळवारी नगर परिषद समोरची दुकाने, आरमोरी मार्ग तसेच मुख्य बाजारपेठेतील काही दुकाने, फळविक्रेते व इतर विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. या दुकानांमध्ये ५० किलो प्लास्टिक आढळून आली. दुकानांमध्ये आढळलेली प्लास्टिक जप्त करण्यात आली आहे. ज्या दुकानदाराकडे प्लास्टिक आढळली, त्यांच्या दुकानाचे नाव नोंदवून यानंतर प्लास्टिकचा वापर न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सद्या प्लास्टिक जप्ती व जनजागृती केली जात आहे. चार ते पाच दिवसानंतर दंडात्मक कारवाईला सुरुवात होईल, अशी माहिती पथकातील कर्मचाºयांनी दिली.
पथकामध्ये पाणीपुरवठा पर्यवेक्षक नितीन गौरखेडे, नितेश सोनवाने, दिनेश धोटे, किशोर ठेमस्कर, श्यामराव खोब्रागडे, वासुदेव अंबादे, संजय मारगोनवार, लोमेश मेश्राम, वाळके, भांडेकर आदी नगर परिषद कर्मचाºयांचा समावेश आहे.
सध्या जनजागृतीवर भर
प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करताना नगर परिषदेने सर्वप्रथम जनजागृतीवर भर दिला आहे. मंगळवारी काही दुकानदारांकडील प्लास्टिक जप्त केली. बुधवारी मुख्य बाजारपेठ व चामोर्शी मार्गावरील दुकानांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीचा उपक्रम आणखी दोन ते तीन दिवस चालणार आहे. एखाद्या दुकानदाराकडे प्लास्टिक आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई न करता केवळ त्याला सूचना दिल्या जात आहेत. त्यानंतर मात्र प्लास्टिक आढळून आल्यास शासनाच्या नियमाप्रमाणे दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पथकातील कर्मचाऱ्यांनी दिली.