५० वर महिला धडकल्या रेगुंठा पोलीस ठाण्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:49 PM2019-06-05T23:49:10+5:302019-06-05T23:50:15+5:30
पोलिसांनी दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून दारूविक्री पूर्णत: बंद करावी, या मागणीसाठी तालुक्यातील रेगुंठा येथे क्लस्टर कार्यशाळेसाठी जमलेल्या कौतूर, नरसिहापली, येला व विठ्ठलरावपेठा या चार गावांतील ५० वर महिला थेट रेगुंठा पोलीस ठाण्यात बुधवारी धडकल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : पोलिसांनी दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून दारूविक्री पूर्णत: बंद करावी, या मागणीसाठी तालुक्यातील रेगुंठा येथे क्लस्टर कार्यशाळेसाठी जमलेल्या कौतूर, नरसिहापली, येला व विठ्ठलरावपेठा या चार गावांतील ५० वर महिला थेट रेगुंठा पोलीस ठाण्यात बुधवारी धडकल्या. दारूविक्रेत्यांविरोधात पोलिसांनी कठोर पावले न उचलल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही यावेळी महिलांनी दिल्याचे मुक्तिपथच्या वतीने कळविण्यात आले.
तालुक्यातील कौतूर, रेगुंठा, नरसिहापल्ली, येला, विठ्ठलरावपेठा या गावांमध्ये मुक्तिपथ गाव संघटनेच्या पुढाकाराने दारूविक्रीबंदीचे ठराव घेण्यात आले आहे.
असे असतानाही छुप्या मार्गाने गावात दारूची विक्री सुरूच आहे. याचा त्रास गावातील महिलांना सहन करावा लागतो. त्यामुळे दारूविक्री बंद करण्यासाठी कोणत्या ठोस उपाययोजना करता येतील, यावर चर्चा करण्यासाठी सदर कार्यशाळा रेगुंठा येथे घेण्यात आली. रेगुंठा या गावातही दारूविक्री बंदीचा ठराव झालेला आहे. गाव संघटन दारूबंदीसाठी सक्रीय प्रयत्न करीत आहेत, असे असतानाही सहा दारूविक्रेते तेलंगणा येथून विदेशी दारूची आयात करून गावात विकतात. पण गावात पोलीस स्टेशन असतानाही या विक्रेत्यांवर कठोर कारवाई होत नाही.क्लस्टर कार्यशाळेत दारू बंदीच्या विषयावर चर्चा करण्यात आली.
त्यानंतर रेगुंठा व इतरही गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ५० वर महिला रेगुंठा पोलीस ठाण्यावर धडकल्या. दारूविक्रेत्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी महिलांनी यावेळी केली. लवकरच या विक्रेत्यांचा बंदोबस्त करणार असल्याचे पोलिसांनी महिलांना सांगितले.