बेरोजगारांसाठी ५०० कोटींची योजना राबवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 12:21 AM2019-04-04T00:21:42+5:302019-04-04T13:04:32+5:30
सुशिक्षीत बेरोजगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यासाठी ५०० कोटींची तरतूद करणार असून यातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची/धानोरा/सिरोंचा : सुशिक्षीत बेरोजगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यासाठी ५०० कोटींची तरतूद करणार असून यातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ बुधवारी कोरची, धानोरा व सिरोंचा येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. कोरची येथील सभेला खा.अशोक नेते, आ.कृष्णा गजबे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, किसन निरंकारी, गणपत सोनकुसरे, चांगदेव फाये, परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्रसिंह चंदेल आदी उपस्थित होते. तसेच धानोरा येथील सभेला आमदार डॉ.देवराव होळी, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, जि.प. सदस्य लता पुंगाटे, पं.स. उपसभापती अनुसया कोरेटी, धानोराच्या नगराध्यक्ष लिना साळवे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.मुनगंटीवार म्हणाले, गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. जिल्हा विकासासाठी जनतेने भाजपच्या उमेदवाराला निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या उपस्थितीत सिरोंचा येथील सभेत ना.मुनगंटीवार यांनी सिरोंचा येथील रुग्णालय, बस स्थानकाचा कायापालट करण्याचे आश्वासन दिले. काँग्रेसच्या काळात निधीअभावी अर्धवट असलेले सिंचन प्रकल्प आम्ही पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंचावर बाबुराव कोहळे, दामोधर अरिगेलावार, सत्यनारायण मंचर्लावार, कलाम हुसैन, राजू पेदापल्ली, रंगूबापू, संदीप राचर्लावार आदी उपस्थित होते.
पोलीस भरतीत ७५ टक्के आरक्षण
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासाठी विशेष पोलीस भरती घेतली जाईल. यात गडचिरोली जिल्ह्यातील ७५ टक्के व चंद्रपूर जिल्ह्यातील २५ टक्के युवकांना संधी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी खा.अशोक नेते यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.