स्मशानभूमीच्या कामांचे ५०३ प्रस्ताव पडले धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:47 PM2018-03-16T23:47:16+5:302018-03-16T23:47:16+5:30
जिल्ह्यातील विविध गावांमधील दहन-दफनभूमीत (स्मशानभूमी) करावयाच्या विविध कामांसाठी जिल्हा परिषदेने तब्बल ५०३ ग्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविले आहेत.
मनोज ताजने ।
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : जिल्ह्यातील विविध गावांमधील दहन-दफनभूमीत (स्मशानभूमी) करावयाच्या विविध कामांसाठी जिल्हा परिषदेने तब्बल ५०३ ग्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविले आहेत. मात्र साडेपाच महिने लोटले तरी त्यापैकी एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी न दिल्यास दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेकडे पडून असलेला ९ कोटी २२ लाख रुपयांचा निधी ३१ मार्चनंतर पुन्हा शासनाकडे परत जाणार आहे.
ग्रामपंचायतींना विशेष अनुदान योजनेअंतर्गत स्मशानभूमीतील गैरसोयी दूर करण्यासाठी २०१० पासून विशेष निधी दिला जातो. त्यानुसार २०१६-१७ मध्ये गडचिरोली जिल्हा परिषदेला ९.२२ कोटींचा निधी मिळाला होता. परंतू त्यावर्षी या योजनेचे प्रस्तावच मंजुरीसाठी गेले नाही. दरम्यान जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने २०१६-१७ आणि २०१७-१८ अशा दोन वर्षातील ५०३ प्रस्तावांची यादी गेल्या २९ सप्टेंबर २०१७ ला जिल्हा नियोजन समितीकडे पाठविली. मात्र आता साडेपाच महिने लोटून चालू आर्थिक वर्षही संपत आले तरीही त्या प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही.
जिल्हा परिषदेने मंजुरीसाठी पाठविलेल्या ५०३ प्रस्तावांची एकूण किंमत ४१ कोटी १६ लाख ५० हजार रुपये आहे. सध्या जि.प.कडे ९ कोटी २२ लाख उपलब्ध असून २०१७-१८ मधील नियतव्यय मंजूर असलेले ३ कोटी रुपये शासनाकडून मिळायचे आहे. अशा एकूण १२ कोटी २२ लाख रुपयांच्या प्रस्तावांची निवड करून त्यांना जिल्हा नियोजन समितीकडून मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. ज्या गावांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळेल त्या गावच्या ग्रामपंचायतींकडे तो निधी लगेच वळता केला जाईल.
बैठकीत चर्चाच नाही?
विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये प्रस्ताव सादर केल्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. पण त्या बैठकीत या प्रस्तावांवर चर्चाच झाली नाही. त्यासाठी कोणाचा दुर्लक्षितपणा कारणीभूत आहे याचा पालकमंत्र्यांना शोध घ्यावा लागणार आहे. आता नवीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुढाकार घेऊन मंजुरीसाठी प्रस्तावांची तातडीने निवड केल्यास आणि पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी मंजुरी दिल्यास ही कामे मार्गी लागून पावसाळ्यापूर्वी स्मशानभूमींमध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकतात.
चामोर्शी व सिरोंचा तालुक्यातून सर्वाधिक प्रस्ताव
जिल्हाभरातून आलेल्या ५०३ गावांमधील प्रस्तावांमध्ये सर्वाधिक ७७ प्रस्ताव चामोर्शी तालुक्यातील आहेत. सिरोंचा तालुक्यातील ७४, कुरखेडा तालुक्यातील ६१, अहेरी तालुक्यातील ५१, धानोरा तालुक्यातील ५०, कोरची तालुक्यातील ३७, आरमोरी तालुक्यातील ३२, एटापल्ली तालुक्यातील ३२, गडचिरोली तालुक्यातील २५, मुलचेरा तालुक्यातील २६, देसाईगंज २० तर सर्वात कमी भामरागड तालुक्यातील १८ प्रस्तावांचा समावेश आहे.
ग्रामपंचायतींकडून प्रत्येकी ५ ते १० लाखांची कामे
शासनाच्या निकषानुसार स्मशानभूमीतील कामांसाठी आलेल्या प्रस्तावांमध्ये ५ ते १० लाखांपर्यंतच्या कामांचा समावेश आहे. त्यात प्रामुख्याने शेडचे बांधकाम, सिमेंट रस्ता, मोरी, चबुतऱ्याचे बांधकाम, बोअरवेल खोदणे, जलशुद्धीकरण (आर.ओ.मशिन) यंत्र बसविणे आदी कामांचा समावेश आहे.