दारू वाटणार नाही, दारू पिणार नाही; ५०८ उमेदवारांचा दारूमुक्त निवडणुकीला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 12:49 PM2021-12-20T12:49:56+5:302021-12-20T13:56:44+5:30
नगर पंचायत निवडणुकीत उभे असलेल्या एकूण ५४७ उमेदवारांपैकी ५०८ उमेदवारांनी दारूमुक्त निवडणुकीला पाठिंबा दिला आहे. काही उमेदवारांनी लिखित वचननामे दिले. तर काहींनी व्हिडिओद्वारा रेकॉर्डेड वचननामे दिले आहेत.
गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी व सिरोंचा या ९ तालुक्यात होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणूक २०२१ करिता उभे असलेल्या एकूण ५४७ उमेदवारांपैकी ५०८ उमेदवारांनी दारूमुक्त निवडणुकीला पाठिंबा दिला आहे.
५०८ उमेदवारांनी लिखित वचननामे दिले. तर काही उमेदवारांनी व्हिडिओद्वारा रेकॉर्डेड वचननामे दिले आहेत. मुक्तिपथ द्वारा दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांना कुठल्याहीप्रकारे दारूचे प्रलोभन दाखविणार नाही, दारू वाटप करणार नाही असे सांगत दारूबंदीला समर्थन दिले आहे, असे वचन त्यांनी दिले आहे.
कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत ६१ पैकी ६१ उमेदवारांनी वचननाम्यावर स्वाक्षरी केली आहे. कोरची ५४, धानोरा ५२, चामोर्शी ४०, मुलचेरा ४६, एटापल्ली ६०, भामरागड ६२, अहेरी ७० व सिरोंचा ६३ अशा एकूण ५०८ उमेदवारांनी दारूमुक्त निवडणुकीसाठी पुढाकार घेतला आहे.
मागील दोन आठवड्यांपासून नगरपंचायत निवडणूक जाहीर झालेल्या ९ तालुक्यांत मुक्तिपथ टीम व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून मतदान जागृती व दारूमुक्त निवडणुकीसाठी आवाहन करण्यात आले. शहरामध्ये मोठे बॅनर, वाॅर्डा-वाॅर्डात मुख्य ठिकाणी पोस्टर, घरोघरी माहितीपत्रक, वाॅर्ड सभा, ऑडिओ क्लिप, शॉर्ट व्हिडिओ आदी विविध पद्धती वापरून जनजागृती करण्यात आली. डॉ. अभय बंग यांनी वर्तमानपत्रातून लिखित आवाहन या उमेदवाराला केले.
कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. मतदानाचा मिळालेल्या हक्काचा सन्मान करून जागृत होऊन मतदान करा. दारू पिणाऱ्या, वाटणाऱ्या उमेदवाराला मत देऊ नका. दोन पैशाची दारू घेऊन आपले अमूल्य मत वाया घालवू नका, जो पाजेल माझ्या नवऱ्याला दारू त्या उमेदवाराला नक्कीच पाडू, वाॅर्डाचे सक्षम नेतृत्व निवडण्याची ताकद तुमच्या एका मतामध्ये आहे, असे विविध संदेश या जनजागृतीमधून देण्यात आले.
असा आहे वचननामा
निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांनी लिहून दिलेल्या वचननाम्यामध्ये ‘जनतेला जाहीर वचन देतो की, नगरपंचायत निवडणुकीत मी व माझा पक्ष मते मिळविण्यासाठी दारूचा वापर करणार नाही. या निवडणुकीत निवडून आल्यास अथवा न आल्यास वॉर्डातील व शहरातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करीन, मी दारू पिणार नाही. असे वचन देतो,’ अशा आशयाचा समावेश आहे.