अबब... ५१९ गावे अजूनही कव्हरेजच्या बाहेरच, झाडावर चढले तरी येथून फाेन लागत नाही
By दिगांबर जवादे | Published: September 24, 2023 03:53 PM2023-09-24T15:53:34+5:302023-09-24T15:55:34+5:30
गडचिराेली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८९ गावे आहेत. यातील निम्म्याहून गावे जंगलांनी वेढलेली आहेत.
गडचिराेली : जगाच्या धावपळीची गती लक्षात घेतली तर माेबाइल ही आता चैनीची वस्तू नाही तर आवश्यक वस्तू बनली आहे. इंटरनेट व माेबाइलचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक गावात माेबाइल कव्हरेज पाेहाेचविण्याचे शासनाचे आदेश आहेत. विस्तारत चाललेल्या माेबाइल बाजारपेठेचा फायदा उचलण्यासाठी बीएसएनएल साेबतच खासगी कंपन्याही ग्रामीण भागात टाॅवर उभारत आहेत. मात्र, गडचिराेली जिल्हा याला अपवाद आहे. बीएसएनएलने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ५१९ गावांमध्ये अजूनही माेबाइलचे कव्हरेज पाेहाेचलेले नाही. या गावांमध्ये झाडावर चढले तरी फाेन लागत नाही.
गडचिराेली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८९ गावे आहेत. यातील निम्म्याहून गावे जंगलांनी वेढलेली आहेत. जिल्ह्यात दूरसंचार सेवेची सुरुवात बीएसएनएलने केली. ग्रामीण भागात टाॅवर उभारले. गरज लक्षात घेऊन टाॅवरची संख्या वाढवली. त्यामुळे अजूनही ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांकडे बीएसएनएलचेच सिम असल्याचे दिसून येते. फायद्याचे गणित मांडत नंतर खासगी कंपन्यांनीही ग्रामीण भागात टाॅवर उभारण्यास सुरुवात केली. मात्र, छत्तीगसड राज्याच्या सीमेवर असलेल्या गावांपर्यंत अजूनही कव्हरेज पाेहाेचले नसल्याची शाेकांतिका आहे.
बाॅक्स
२२० टाॅवरचे काम कधी पूर्ण हाेणार
-जिल्ह्यात बीएसएनएलचे एकूण २१७ टाॅवर काम करीत आहेत. मात्र, ग्राहकांची गरज लक्षात घेऊन पुन्हा बीएसएनएलने २२० टाॅवर प्रस्तावित केले आहेत. त्यांचे काम सुरू आहे. ते काम कधी पूर्ण हाेणार याची प्रतीक्षा आहे.
- खासगी कंपन्यांच्या टाॅवरची संख्या वाढत आहे. मात्र, जेथे फायद्याचे गणित आहे, त्याच ठिकाणी खासगी कंपन्या टाॅवर उभारतात. दुर्गम किंवा नक्षलग्रस्त भागात टाॅवर उभारत नाही. प्रामुख्याने तालुकास्थळी व शहरी भागातच माेबाइल टाॅवर उभारतात.
बाॅक्स
देसाईगंज तालुक्यात प्रत्येक गावी कव्हरेज
देसाईगंज तालुक्यातील प्रत्येक गावात माेबाइलचे कव्हरेज पाेहाेचले आहे. खासगी कंपन्यांच्या टाॅवरची संख्याही अधिक आहे. जिल्ह्यातील बारा तालुक्यांपैकी सर्वच गावात कव्हरेज पाेहाेचलेला देसाईगंज हा एकमेव तालुका आहे.