पीककर्जाची ५२ टक्के वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 05:00 AM2021-03-20T05:00:00+5:302021-03-20T05:00:33+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत २०२०-२१ या वर्षात १९ हजार ८३८ शेतकऱ्यांना ६२ काेटी ७३ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले हाेते. १७ मार्चपर्यंत ३२ काेटी ३५ लाख रुपयांच्या कर्जाची वसुली झाली असून, टक्केवारीमध्ये हे प्रमाण ५१.५८ टक्के एवढे आहे. शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनामार्फत मागील काही वर्षांपासून पंजाबराव देशमुख व्याज सवलत याेजना राबविली जात आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : खरीप हंगामासाठी घेतलेले कर्ज ३१ मार्चपूर्वी भरल्यास त्यावर काेणतेही व्याज आकारले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीककर्ज भरण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत २०२०-२१ या वर्षात १९ हजार ८३८ शेतकऱ्यांना ६२ काेटी ७३ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले हाेते. १७ मार्चपर्यंत ३२ काेटी ३५ लाख रुपयांच्या कर्जाची वसुली झाली असून, टक्केवारीमध्ये हे प्रमाण ५१.५८ टक्के एवढे आहे. शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनामार्फत मागील काही वर्षांपासून पंजाबराव देशमुख व्याज सवलत याेजना राबविली जात आहे. या याेजनेची मुख्य अट म्हणजे, खरिपामध्ये घेतलेल्या कर्जाची ३१ मार्चपूर्वी परतफेड हाेणे आवश्यक आहे. अन्यथा व्याज सवलतीचा लाभ दिला जात नाही. संबंधित शेतकऱ्यावर संपूर्ण वर्षाची व्याज आकारली जाते. त्यामुळे बहुतांश शेतकरी ३१ मार्चपूर्वी कर्ज भरण्याचा प्रयत्न करतात. बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने बहुतांश शेतकरी पीककर्जाची उचल करण्यास प्राधान्य देतात.
२०२०-२१ या खरीप हंगामात जिल्हा बॅंकेमार्फत १९ हजार ८३८ शेतकऱ्यांना ६२ काेटी ७३ लाख रुपयांच्या कर्जाचे वितरण केले हाेते. त्यापैकी १७ मार्चपर्यंत ३२ काेटी ३५ लाख रुपयांचा भरणा शेतकऱ्यांनी केला आहे. कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पुन्हा १२ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.
३१ मार्चपूर्वी पीक कर्ज भरल्यास संबंधित शेतकऱ्याला केवळ कर्जाची मुद्दल रक्कम भरावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा करावा. जे शेतकरी कर्जाचा भरणा करतात, त्यांना कर्ज वितरणाची प्रक्रिया एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू हाेते. ३१ मार्चनंतर कर्ज भरल्यास व्याज सवलत याेजनेसाठी संबंधित शेतकरी पात्र ठरत नाही. तसेच कर्जही मिळण्यास उशीर हाेतो. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी कर्जाच्या वसुलीचे प्रमाण अधिक असून, ९५ टक्क्यांपर्यंत कर्ज वसुली हाेईल, अशी अपेक्षा आहे.
- सतीश आयलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, गडचिराेली