५४ पूल धोकादायक
By admin | Published: July 14, 2017 02:06 AM2017-07-14T02:06:58+5:302017-07-14T02:06:58+5:30
जिल्ह्यातील एकूण पुलांपैकी ५२ पुलांची उंची कमी असल्याने या पुलावरून पावसाळ्यात पाणी वाहते.
पावसाळ्यात तुटतो संपर्क : ठेंगण्या पुलांवरून चढते पावसाचे पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील एकूण पुलांपैकी ५२ पुलांची उंची कमी असल्याने या पुलावरून पावसाळ्यात पाणी वाहते. त्यामुळे ही ५४ पुले धोकादायक असल्याचे दिसून येते. काही गावांना तर या पुलांव्यतिरिक्त इतर ठिकाणावरून जाण्यासाठी मार्ग नसल्याने या पुलांवरून पाणी वाहू लागताच संबंधित गावांचा जगाशी संपर्क तुटतो. त्यामुळे पावसाळयादरम्यान या पुलांच्या पाणी पातळीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे.
नक्षल्यांची दहशत व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष यामुळे एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी या तालुक्यांमधील दुर्गम भागातील रस्ते व पुलांचे बांधकाम अजूनपर्यंत होऊ शकले नाही. जिल्ह्यातील शेकडो गावे अजुनही बारमाही रस्त्यांपासून वंचित आहेत. या गावांना पायवाटेनेच जावे लागते. त्यामुळे पावसाळ्यादरम्यान या गावांना जाणे अशक्य होते. तर पावसाळ्यादरम्यान एखादा ओढा या गावाचा मार्ग अडवून धरतो. काही मुख्य मार्गांवर पुलांचे बांधकाम २० वर्षांपूर्वी करण्यात आले होते. तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन अत्यंत ठेंगणे पूल बांधण्यात आले.
सदर पुलांची उंची वाढविणे आवश्यक असले तरी अजूनपर्यंत काही पुलांची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. दरवर्षी पावसाळ्यादरम्यान या पुलांवरून पाणी वाहत राहते. त्यामुळे संबंधित गावांचा जगाशी संपर्क तुटतो. काही पूल तर अतिशय जुने असून कोसळण्याच्या स्थितीत आहेत. मात्र सदर पुलांची डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली नाही. परिणामी सदर पूल कधीही कोसळण्याचा धोका आहे. हा धोका माहित असतानाही संबंधित गावकऱ्यांना इतर पर्याय उपलब्ध नसल्याने याच पुलावरून धोकादायक प्रवास करावा लागतो.
गृहमंत्रालयाच्या मदतीची प्रतीक्षा
पुलांची उंची वाढविण्याविषयी राज्य व केंद्र शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला. मात्र कधी नक्षलवाद तर कधी निधीचे कारण पुढे करून पुलाची उंची वाढविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने विशेष निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण अवलंबिले आहे. या अंतर्गतच नक्षलग्रस्त भागात टॉवरचे बांधकाम करण्यात येत आहे. गोदावरी नदीवरील सिरोंचा जवळील पूल याच योजनेतून बांधण्यात आला आहे. त्यामुळे या पुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.
३७ गावांना पर्यायी रस्तेच नाही
५४ पुलांची उंची कमी असल्याने या पुलांवरून पावसाळ्यादरम्यान पाणी वाहते. त्यामुळे या गावांचा संपर्क तुटतो. मात्र ३७ गावे अशी आहेत की, या ठेंगण्या पुलावरून पाणी वाहत राहत असल्यास इतर पुलावरून जाता येत नाही. त्यामुळे या गावांचा जगाशीच संपर्क तुटतो. या कालावधीत एखादा गंभीर रूग्ण असल्यास किंवा गरोदर मातेला प्रसूतीसाठी रूग्णालयात दाखल करायचे झाल्यास काहीच पर्याय शिल्लक राहत नाही. त्यामुळे अशा पुलांना प्राधान्य देऊन त्यांची उंची वाढविणे आवश्यक आहे. इतर १७ मार्गावरील पुलांवरून पाणी राहिल्यास दुसऱ्या गावावरून त्या गावामध्ये जाण्याची सुविधा उपलब्ध होत असल्याने तेथील नागरिकांना फारशी अडचण जाणवत नाही.