५७ गावांची रुग्णवाहिका निराधार
By admin | Published: July 1, 2016 01:33 AM2016-07-01T01:33:45+5:302016-07-01T01:33:45+5:30
तालुक्यातील सर्वात मोठे व जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या महागाव येथील ...
वर्षभरापासून चालक नाही : महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वाहनाअभावी रुग्णांची गैरसोय
अहेरी : तालुक्यातील सर्वात मोठे व जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या महागाव येथील रुग्णवाहिकेला वर्षभरापासून चालक नसल्याने येथे औषधोपचारासाठी ये-जा करणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे. परिणामी येथील तत्काळ रुग्णसेवा कोलमडली आहे. अनेक रुग्णांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
तालुक्यातील ५७ गावे व ६२ हजार लोकसंख्येवर औषधोपचार करण्याची भिस्त असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १४ उपकेंद्र येतात. परंतु येथील रुग्णवाहिकेला वर्षभरापासून चालक नसल्याने ती निरूपयोगी ठरत आहे. आरोग्य केंद्राकरिता एकच रुग्णवाहिका घेण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांची ने-आण करणे अत्यंत त्रासदायक ठरत होते. परंतु वर्षभरापासून चालक नसल्याने अनेक रुग्णांना पर्यायी व्यवस्था करून प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचारासाठी यावे लागत होते. येथील चालकाचे पद तत्काळ भरावे, अशी मागणी अनेकदा निवेदनाद्वारे शासन, प्रशासनाकडे करण्यात आली. परंतु समस्येची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे रुग्णवाहिका निरूपयोगी ठरत आहे. यासंदर्भात आरोग्य अधिकारी आर. एम. राऊत यांची विचारणा केली असता, या परिस्थितीबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. आरोग्य केंद्राचा व्याप व येथील लोकसंख्या लक्षात घेता आणखी एका रुग्णवाहिकेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
५७ गावांतील ६२ हजार लोकांच्या आरोग्याकडे जिल्हा परिषद कानाडोळा करीत आहे. महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा व्याप लक्षात घेता येथील रुग्णवाहिकेला तत्काळ चालक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अहेरी भाजप तालुकाध्यक्ष संजय अलोणे यांनी प्रशासनाकडे केली आहे. (शहर प्रतिनिधी)
शिपाई चालवित होते रुग्णवाहिका
वर्षभरापासून रुग्णवाहिकेला चालक नसल्यामुळे येथील शिपाई म्हणून कार्यरत असलेले कर्मचारी रुग्णवाहिका चालवित होते. परंतु ग्रामस्थांनी मागणी रेटून धरल्यानंतर ४ मे रोजी जिल्हा परिषदेच्या वतीने एस. यू. गेडाम यांची चालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. परंतु ते एका दिवशी येऊन आपला रूजू अर्ज टेबलावर ठेवून कोणालाही न भेटता त्याच दिवशी पसार झाले. अद्यापही ते गायब आहेत. परिणामी येथे उपचारासाठी येणाऱ्या व गावी परत जाणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे.