५८ शाळा डिजिटल करण्यासाठी मिळाला निधी
By Admin | Published: March 26, 2017 12:44 AM2017-03-26T00:44:20+5:302017-03-26T00:44:20+5:30
लोकवर्गणीतूनच शाळा डिजिटल करण्याचे निर्देश शासनाने राज्यभरातील शाळांना दिले होते. मात्र काही निवडक शाळा आदर्शवत ठरतील, ....
५० लाखांचा निधी वितरित : सर्व शिक्षा अभियानची मदत
गडचिरोली : लोकवर्गणीतूनच शाळा डिजिटल करण्याचे निर्देश शासनाने राज्यभरातील शाळांना दिले होते. मात्र काही निवडक शाळा आदर्शवत ठरतील, अशा पद्धतीने डिजिटल करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिक्षक वर्गातून सातत्याने केली जात होती. त्यानुसार शासनाने राज्यातील १ हजार ९८५ शाळांमध्ये डिजिटल यंत्रणा बसविण्यासाठी सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून प्रत्येक शाळेला ८५ हजार ८८२ रूपये प्रमाणे १७ कोटी ८ लाख १९ हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील ५८ शाळा डिजिटल करण्यासाठी ४९ लाख ८१ हजार १५६ रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
राज्यभरातील १०० टक्के शाळा ३१ मार्चपूर्वी डिजिटल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शाळा डिजिटल करण्यासाठी लागणारा खर्च शाळांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून गोळा करावा, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार काही शाळांनी लोकवर्गणी करून आपापल्यापरीने डिजिटल साहित्य खरेदी केली आहेत. सुरुवातीला शाळांना निधी देण्यास शासनाने नकार दिला होता. मात्र शिक्षक वर्गातून निधी देण्याबाबतची मागणी शासनाकडे सातत्याने केली जात होती. त्यानुसार सर्वशिक्षा अभियानच्या माध्यमातून शिक्षण परिषदेने शाळा डिजिटल करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी जवळपास प्रत्येक जिल्ह्यातील ५५ ते ५८ शाळांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेला ८५ हजार ८८२ रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सदर निधी ५ ते ७ पर्यंत वर्ग असलेल्या शाळेसाठी वापरला जाणार असून या निधीतून त्या शाळेतील तीन वर्ग डिजिटल केले जाणार आहेत. प्रत्येक वर्गासाठी २८ हजार ६२७ रूपये खर्च येणार आहे. या निधीतून संबंधित शाळेने ३२ इंचीचा फूल एचडी एलईडी लार्ज फॉरमॅट डिस्प्ले खरेदी करता येणार आहे. सदर डिस्प्ले १९२० बाय १०८० फूल एचडी असेल. त्याला १ यूएसबी, १ व्हीजीए, १ आरजे, १० वॅट किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचा स्पिकर असणे आवश्यक आहे. टॅबलेटची रॅम १ जीबी किंवा त्यापेक्षा जास्त असावी, इंटरनल स्टोरेज ८ जीबी व एस्पांडेबल मेमरी ३२ जीबी असावी, डिस्प्ले ७ इंचीचा असावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. काही शाळांनी टीव्ही खरेदी केला आहे. या निधीतून कोणत्याही परिस्थितीत टीव्ही खरेदी करू नये, त्याऐवजी डिस्प्लेच खरेदी करावा, असेही निर्देश दिले आहेत.
उपकरण खरेदीबाबतचा ठराव शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात यावा, साहित्य खरेदी नंतर १० एप्रिलपर्यंत उपयोगीता प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. (नगर प्रतिनिधी)
शाळांना घाई
३१ मार्चपूर्वी सर्व शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने दिले आहे. त्यामुळे शिक्षक कामाला लागले असून लोकवगर्णीतून साहित्य गोळा करून साधने खरेदी केली जात आहेत.