जि.प.चा आरोग्य विभागच 'आजारी'; १८ पैकी १५ संवर्गातील ५९१ पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 02:40 PM2024-09-20T14:40:03+5:302024-09-20T14:44:04+5:30

उपचारासाठी अडचणी : दुर्गम, अतिदुर्गम भागातील रुग्णांचे होताहेत सतत हाल

591 posts vacant in 15 out of 18 cadres in Health Department | जि.प.चा आरोग्य विभागच 'आजारी'; १८ पैकी १५ संवर्गातील ५९१ पदे रिक्त

591 posts vacant in 15 out of 18 cadres in Health Department

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला रिक्त पदांचा आजार जडलेला आहे. जि. प. अंतर्गत एकूण मंजूर १ हजार ३२८ पदांपैकी ७३७ पदे भरलेली आहेत, तर ५९१ पदे रिक्त आहेत. यामुळे दुर्गम भागातील रुग्णांना वेळीच उपचार न मिळणे व उपचाराअभावी मृत्यू यासारख्या घटनांवरून जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडत असल्याचे चित्र अधूनमधून दिसून येत आहे.


जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्र, आरोग्य पथक व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्यसेवा दिली जाते. याशिवाय जिल्हा परिषद अंतर्गत सहायक संचालक कुष्ठरोग, माता बाल संगोपन अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, साथरोग अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून आरोग्य सेवेची अंमलबजावणी व संनियंत्रण केले जाते. अधिकाऱ्यांची ही प्रमुख पदे सध्या प्रभारींच्या खांद्यावर आहेत. एकूण १८ संवर्गांपैकी तब्बल १५ संवर्गातील विविध पदे रिक्त आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा प्रशिक्षण पथकाचे वैद्यकीय अधिकारी प्रत्येकी एक तर आरोग्य सहायक (महिला) एकूण ५३ पदे ही पदे भरलेली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील अन्य रिक्त पदे केव्हा भरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


प्रधान सचिवांकडे पाठपुरावा सुरू 
जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावीत, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी १९ जुलै २०२४ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला. यासंदर्भात त्यांनी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना नियमित पदे भरण्याची विनंती केली होती; परंतु दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत काहीच कार्यवाही झालेली नाही.


वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पदांबाबतची स्थिती 
पदाचे नाव                          मंजूर पदे                     भरलेली                 रिक्त पदे

वैद्यकीय अधिकारी गट-अ           ७८                           ७५                           ०३
वैद्यकीय अधिकारी गट-ब            ७९                           ५९                            २०
प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी     ५८                           ५३                           ०५
औषध निर्माण अधिकारी               ८४                          ६०                            २४
आरोग्य सहायक (पुरुष)               १००                         ९८                             ०२
आरोग्य सहायक (महिला)             ५३                           ५३                            ००
आरोग्य सेवक (पुरुष)                   २९८                        ९७                            २०१
आरोग्य सेविक (महिला)                ५५७                       २२९                          ३२८


जिल्हा आरोग्य अधिकारी नियमित, बाकी सर्व प्रभारी 

  • जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे पद भरलेले आहे; परंतु वर्ग-१ ची अनेक पदे रिक्त आहेत. 
  • यामध्ये अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक संचालक (कुष्ठरोग), जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी आदी पदे तसेच जिल्हा हिवताप अधिकारी वर्ग- २, वैद्यकीय अधिकारी (साथरोग) आदी पदे रिक्त आहेत. 
  • विशेष म्हणजे, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची १२ पैकी ११ पदे भरलेली आहेत, ही जमेची बाजू आहे.

 

Web Title: 591 posts vacant in 15 out of 18 cadres in Health Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.