गडचिरोलीत तेंदू कंत्राटदाराने बुडवली ग्रामसभांची ६ कोटींची रॉयल्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 03:18 PM2020-06-06T15:18:52+5:302020-06-06T15:19:30+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील पेसाअंतर्गत ५ ग्रामसभांच्या तेंदूपत्त्याची उलच केल्यानंतर रॉयल्टीची ६ कोटींची रक्कम गोंदिया येथील एका तेंदू कंत्राटदाराने बुडविल्याचा आरोप ग्रामसभांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील पेसाअंतर्गत ५ ग्रामसभांच्या तेंदूपत्त्याची उलच केल्यानंतर रॉयल्टीची ६ कोटींची रक्कम गोंदिया येथील एका तेंदू कंत्राटदाराने बुडविल्याचा आरोप ग्रामसभांनी केला आहे. विशेष म्हणजे सदर कंत्राटदार वेगवेगळ्या नावाने तेंदूचे कंत्राट घेऊन गडचिरोली जिल्ह्यात आपला व्यवसाय करत आहे. त्यामुळे सदर कंत्राटदाराने जुनी रॉयल्टीची रक्कम दिल्याशिवाय त्यांना नवीन माल वाहतुकीची परवानगी देऊ नये, असे साकडे ग्रामसभांनी प्रशासनाला घातले आहे.
स्रेहल बिपीनभाई पटेल रा.गोंदिया असे सदर तेंदू कंत्राटदाराचे नाव आहे. या कंत्राटदाराने तेंदूपत्ता हंगाम २०१७ मध्ये ट्रेडिंग स्रेहल कंपनी आणि किशोरीलाल अॅन्ड कंपनी या नावाने एटापल्ली तालुक्यातील सुरजागड इलाक्यामधील गट्टा, गर्देवाडा, वांगेतुरी, जांबिया आणि जबेली या ग्रामसभांसोबत तेंदूपत्ता संकलनासाठी करार केला होता. त्यानुसार गट्टा, जांबिया व गर्देवाडा या तेंदू युनिटसाठी प्रति स्टँडर्ड बॅग १६ हजार तर वांगेतुरी व जबेली युनिटसाठी १४ हजार असा दर निश्चित करून करारनामा केला होता. सदर माल आपल्या गोदामात साठवल्यानंतर कंत्राटदाराने रॉयल्टीची प्रथम हप्त्याची रक्कम ग्रामसभांच्या खात्यात जमा केली. त्यानुसार ग्रामसभांनी टीपी ३ करिता नाहरकत प्रमाणपत्र देऊन वनविभाग भामरागड यांच्याकडून टीपी ३ मिळवून दिली आणि तेवढ्या मालाची विक्रीही झाली होती. मात्र त्यानंतर रॉयल्टीची कोणतीही रक्कम न देता कंत्राटदाराने मालाची परस्पर विक्री केल्याचा आरोप ग्रामसभांनी केला आहे.
आजच्या स्थितीत सदर कंत्राटदाराकडे रॉयल्टीपोटी गट्टा ग्रामपंचायतचे १.५६ कोटी, जांबियाचे १.१५ कोटी, गर्देवाडाचे १.१३ कोटी, वंगेतुरीचे १.२९ कोटी आणि जवेलीचे १.२५ कोटी असे एकूण ६ कोटी ४० लाख रुपये थकित आहेत. यासंदर्भात गेल्यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार केली होती. परंतू प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. आता या ग्रामसभांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांसह वनविभाग, पोलीस विभाग आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला निवेदन देऊन आपली व्यथा मांडली आहे.
वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावे कंत्राट
५ ग्रामसभांची रॉयल्टीची रक्कम न देता आता कंत्राटदार पटेल हे वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने एटापल्ली आणि धानोरा तालुक्यात तेंदूपत्ता संकलनाचा व्यवसाय करत असल्याचे ग्रामसभांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे सदर कंत्राटदाराची मालवाहतूक करणारी वाहने तात्काळ थांबवून ती ताब्यात घ्यावी, अशी मागणी पाचही ग्रामसभांच्या वतीने जि.प.सदस्य सैनू गोटा, दोहे हेडो, रैनू पुंगाटी, मंगेश होळी, रामजी गोटा, मंगेश देवू नरोटे यांनी केली आहे.