आधारसाठी चिमुकल्यांचा ६० किमी प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 05:00 AM2020-07-23T05:00:00+5:302020-07-23T05:00:30+5:30
लॉकडाऊनमुळे बससेवा व खासगी प्रवासी वाहतूक बंद असल्याने मिळेल त्या वाहनाने यावे लागते. अनेक गावातील महिला व पुरूष आपल्या चिमुकल्यांना टेम्पो व ट्रॅक्टरसारखे भाड्याचे वाहन करून त्यात बसवून आधारकार्ड नोंदणी स्थळी आणत आहेत. तालुक्याच्या पेंढरी, गट्टा, गोडलवाही, सावरगाव, मुरूमगाव आदी ठिकाणावरून ५० ते ६० किमी अंतराचा प्रवास करून धानोरा येथे आधारकार्ड केंद्र गाठावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : शासकीय योजनांच्या लाभासाठी आधारकार्ड सक्तीचे आहे. यापासून आबालवृद्ध सुटले नाहीत. जन्मानंतर काही महिन्यातच बालकाच्या आधारकार्डची नोंद अंगणवाडी केंद्रात केल्यानंतरच माता व बालकाला शासनाकडून खिचडी व पोषक आहार दिला जातो. जोपर्यंत आधारकार्ड क्रमांक दिला जात नाही. तोपर्यंत लाभ मिळत नाही. मात्र अंगणवाडीत आधारकार्ड काढण्याची सोय नसल्याने मिळणाऱ्या लाभासाठी धानोरा तालुक्याच्या दुर्गम भागातील माता व बालकांना ६० किमी अंतराचा प्रवास करून धानोरा येथे यावे लागत आहे.
अंगणवाडी केंद्रात ० ते ६ वर्ष वयोगटातील मुले, गरोदर माता, स्तनदा माता आदींची नोंदणी केली जाते. नोंदणीनंतर तीन वर्षाखालील बालकांना चवळी, मूगडाळ, तांदूळ, गहू, चना, मोट, तिखट, मीठ, तेल, हळद दिली जाते. तसेच तीन वर्षाखालील बालकांना अंगणवाडीतच शिवविलेला आहार, अंडी दिली जाते. परंतु लॉकडाऊमुळे अंगणवाडी केंद्र बंद आहेत. त्यामुळे साहित्यासाठी पैसे बँक खात्यात जमा केले जात आहेत. तर काही ठिकाणी घरपोच साहित्य दिले जात आहेत. परंतु हा सर्व लाभ मिळविण्यासाठी आधारकार्ड असणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही त्यांना लाभ दिला जात नाही. त्यामुळे जन्मानंतर काही महिन्यातच पालक बालकांचे आधारकार्ड नोंदणी करतात. धानोरा तालुक्याच्या ग्रामीण भागात आधारकार्ड नोंदणी केंद्र नाहीत. त्यामुळे ५० ते ६० किमी अंतरावरून माता व पालकांना बालकांना सोबत घेऊन धानोरा येथे यावे लागत आहे.
लॉकडाऊनमुळे बससेवा व खासगी प्रवासी वाहतूक बंद असल्याने मिळेल त्या वाहनाने यावे लागते. अनेक गावातील महिला व पुरूष आपल्या चिमुकल्यांना टेम्पो व ट्रॅक्टरसारखे भाड्याचे वाहन करून त्यात बसवून आधारकार्ड नोंदणी स्थळी आणत आहेत. तालुक्याच्या पेंढरी, गट्टा, गोडलवाही, सावरगाव, मुरूमगाव आदी ठिकाणावरून ५० ते ६० किमी अंतराचा प्रवास करून धानोरा येथे आधारकार्ड केंद्र गाठावे लागत आहे. विशेष म्हणजे टेम्पोसारख्या वाहनात दाटीवाटीने बसून यावे लागत असल्याने ये-जा करतानाच चिमुकल्यांना उकाड्यासह धक्क्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका असल्याने प्रवाशी वाहनांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. परंतु नाईलाजास्तव दुर्गम भागातील नागरिकांना ही नियमावली मोडून मिळणाºया लाभाकरिता आधार कार्ड काढण्यासाठी कोरोनाचा धोका पत्करावा लागत आहे.
प्रवासबंदीमुळे स्थानिक स्तरावर सोय हवी
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून १० वर्षाखालील मुले, गरोदर माता तसेच ६० वर्षावरील वृद्धांना प्रवासाची बंदी आहे. याचदरम्यान खासगी प्रवासी वाहतूक बंद आहे. विशिष्ट मार्गावर परिवहन महामंडळाच्या बसेस सुरू आहेत. परंतु दुर्गम भागात ही सोय नाही. परिणामी दुर्गम भागातील नागरिकांना चिमुकल्यांची आधार नोंदणी करण्यासाठी ५० ते ६० किमी अंतरावरून कोंबलेल्या स्थितीत खासगी मालवाहक वाहनांमधून प्रवास करावा लागत आहे.
तालुका व जिल्हा मुख्यालयात तसेच मध्यवर्ती गावांमध्ये आधार नोंदणी केंद्र आहेत. परंतु धानोरा तालुक्यासारख्या दुर्गम भागात आधार नोंदणी केंद्र नाही. धानोरा येथे येऊन आधार नोंदणी करावी लागते. आलेल्या दिवशीच आधार नोंदणी होईल, याची शाश्वती कमी असते. काम न झाल्यास परत गावाकडे जाऊन दुसºया दिवशी पुन्हा त्याच कामाकरिता यावे लागते. यात त्यांना त्रास सोसावा लागतो. बालकांच्या हितासाठी स्थानिक स्तरावरच विशिष्ट अवधीत आधार नोंदणी शिबिरे घ्यावी.