६१५ नक्षल्यांनी सोडली चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:09 AM2018-08-17T00:09:21+5:302018-08-17T00:09:44+5:30
लोकशाही व्यवस्थेतच आदिवासी बांधवांचा विकास शक्य असल्याची जाणीव झाल्यामुळे हिंसेचा मार्ग सोडून आतापर्यंत ६१५ नक्षलवाद्यांची आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील सर्वाधिक ५९६ नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकशाही व्यवस्थेतच आदिवासी बांधवांचा विकास शक्य असल्याची जाणीव झाल्यामुळे हिंसेचा मार्ग सोडून आतापर्यंत ६१५ नक्षलवाद्यांची आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील सर्वाधिक ५९६ नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
आदिवासी बांधवाच्या हितासाठी लढण्याची भाषा करून स्वत: सुखी संपन्न असलेले नक्षली नेते राज्यातील
आदिवासी भागातील तरूण-तरूणींना, तसेच लहान मुलांना खोट्या भूलथापा देऊन आपल्या जाळ्यात ओढतात. या तरूण-तरूणींना काही वर्षातच आपण भरकटले गेलो असल्याची जाणीव होते. मात्र बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला वरिष्ठ नक्षल्यांच्या आदेशाने जिवे मारण्यात येईल, अशी भीती सहकारी नक्षलवाद्यांकडून दाखविली जाते. त्यामुळे हे तरूण मनाविरूध्द नक्षल्यांना साथ देत असतात. नक्षल चळवळीत भरकटलेला आदिवासी बांधव लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात यावा, या उद्देशाने राज्य शासनाने २९ आॅगस्ट २००५ पासून आत्मसमर्पण योजना सुरु केली. सन २००५ ते जून २०१८ या कालावधीत गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील ६१५ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यात केवळ गडचिरोली जिल्ह्यातील ५९६, तर गोंदिया जिल्ह्यातील १७ व चंद्रपूर जिल्ह्यातील २ नक्षलवाद्यांचा समावेश आहे. यामध्ये १ दंडकारण्य स्पेशल झोनल कमेटी सदस्य, ६ डिव्हीजनल कमेटी सदस्य, २५ कमांडर, २९ उपकमांडर, ३१५ दलम सदस्य, ११५ क्षेत्रीय/ग्रामरक्षक दल सदस्य, १२४ संगम सदस्य यांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात एकूण ७ दलम सदस्य, ५ क्षेत्रीय/ ग्रामरक्षक दल सदस्य, ६५ संगम सदस्य अशा एकूण ७७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यात गडचिरोलीतील ६७ व गोंदिया येथील १० नक्षलवाद्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात गडचिरोली येथील २ उपकमांडर, १० दलम सदस्य, १ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य, ४ संगम सदस्य अशा एकूण १७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. तिसऱ्या टप्प्यात २ उपकमांडर, २७ दलम सदस्य, १५ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य, ३१ संगम सदस्य अशा एकूण ७५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात गोंदियातील एका नक्षलवाद्याचा समावेश आहे. चवथ्या टप्प्यात ३ कमांडर, ३ उपकमांडर, २७ दलम सदस्य, ७६ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य, २४ संगम सदस्य अशा एकूण १३३ नक्षलवाद्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारला.
पाचव्या टप्प्यात १ दंडकारण्य स्पेशल झोनल कमेटी सदस्य रैना ऊर्फ रघू ऊर्फ जालमलाय लालुसाय सडमेक याने आत्मसमर्पण केल्यामुळे पोलिसांना फार मोठे यश प्राप्त झाले. तसेच १ डिव्हीजनल कमेटी सदस्य, ३ दलम कमांडर, २ उपकमांडर, २३ दलम सदस्य अशा ३० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात गडचिरोलीतील २८ व गोंदिया येथील २ नक्षलवाद्यांचा समावेश आहे. सहाव्या टप्प्यात १ डिव्हीजनल कमेटी सदस्य, १२ दलम सदस्य, २ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य अशा एकूण १५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
सातव्या टप्प्यात ३ कमांडर, ३ उपकमांडर, १५ दलम सदस्य अशा एकूण २१ नक्षलवाद्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारला. आठव्या टप्प्यात २ कमांडर, ७ दलम सदस्य, ३ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य अशा एकूण १२
नक्षलवाद्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारला. त्यात गडचिरोलीतील ११ व चंद्रपूरातील एका नक्षलवाद्याचा समावेश आहे. नवव्या टप्प्यात २ डिव्हीजनल कमेटी सदस्य, ४ कमांडर, २ उपकमांडर, ३५ दलम सदस्य, ४ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य अशा एकूण ४७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यात ४५ गडचिरोलीतील १ यवतमाळ व १ गोंदिया येथील नक्षलवाद्याचा समावेश आहे.
दहाव्या टप्प्यात १ डिव्हीजनल कमेटी सदस्य, ३ कमांडर, ७ उपकमांडर, ६२ दलम सदस्य, २ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य अशा एकूण ७५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यात ३ गोंदिया येथील नक्षलवाद्याचा समावेश आहे.
अकराव्या टप्प्यात १ डिव्हीजनल कमेटी सदस्य, ६ कमांडर, ६ उपकमांडर, ७८ दलम सदस्य, ७ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य अशा एकूण ९८ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
नक्षलवाद्यांनो लोकशाहीचा मार्ग स्विकारा- शरद शेलार
नक्षल चळवळीतून बाहेर निघण्यासाठी राज्य शासन व पोलिस आत्मसमर्पण योजना राबवित आहेत. जंगलात नक्षलवाद्यांविरोधात लढा देणाºया पोलिसांकड़ून जनसंवादावर विशेष भर देण्यात येत आहे. म्हणूनच सध्या मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी आत्मसमर्पणाचा मार्ग स्विकारत आहेत. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना शासनाकडून आर्थिक मदत व इतर लाभ देण्यात येत आहेत. त्यामुळेच आत्मसमर्पित झालेले नक्षलवादी सध्या सुखी समाधानाचे आयुष्य जगत आहेत. त्यांना रहायला भूखंड व रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे आत्मसमर्पितांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जंगलातील इतर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्विकारून लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांनी केले आहे.