१० दिवसांत मलेरियाचे ६१७ रूग्ण आढळले
By admin | Published: November 15, 2014 10:46 PM2014-11-15T22:46:20+5:302014-11-15T22:46:20+5:30
एटापल्ली या आदिवासीबहूल, नक्षलग्रस्त, मागास तालुक्यामध्ये १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबरदम्यान आरोग्य विभागाच्यावतीने आजाराने ग्रस्त असलेल्या एकूण ३ हजार ३२ रूग्णांचे
एटापल्ली : एटापल्ली या आदिवासीबहूल, नक्षलग्रस्त, मागास तालुक्यामध्ये १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबरदम्यान आरोग्य विभागाच्यावतीने आजाराने ग्रस्त असलेल्या एकूण ३ हजार ३२ रूग्णांचे रक्त नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. १० दिवसात यापैकी तब्बल ६१७ रूग्ण मलेरिया पॉझिटीव्ह आढळून आले असल्याने आरोग्य विभागात खळबळ माजली आहे.
एटापल्ली तालुक्यात तोडसा, गट्टा, कसनसूर आदी तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या केंद्रांतर्गत एकूण ३८ उपकेंद्र आहेत. एटापल्ली तालुका मुख्यालयी एकमेव ग्रामीण रूग्णालय आहे. १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या १० दिवसांच्या कालावधीत तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये १५३ रूग्ण मलेरियाग्रस्त आढळून आले. कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात १८१ व गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात १०४ रूग्ण मलेरियाने बाधीत आढळून आले. एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयात सर्वाधिक १७९ रूग्ण मलेरियाने बाधीत आढळून आले. मागील महिन्यात म्हणजे आॅक्टोबरमध्ये तालुक्यात एकूण १९ मलेरिया बाधीत रूग्ण आढळून आले होते. मात्र नोव्हेंबर महिन्यात केवळ १० दिवसांच्या कालावधीत ६१७ रूग्ण मलेरिया बाधीत आढळून आले आहेत. यामुळे एटापल्ली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य, उपकेंद्र, ग्रामीण रूग्णालय मलेरियाबाधीत रूग्णांनी हाऊसफुल झाले असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी एटापल्ली तालुक्यातील गावागावात जाऊन रूग्णांना मलेरियाच्या गोळ्या वितरीत आहेत. याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांच्यावतीने संपूर्ण तालुकाभर आजाराविषयी जनजागृतीही सुरू आहे. मात्र अद्यापही एटापल्ली तालुक्यातील मलेरियाची साथ आटोक्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात एटापल्लीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. असद फहीम यांच्याशी संपर्क साधला असता, मलेरियाच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.