६२ ग्रा.पं. सदस्य अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:24 AM2018-02-21T01:24:24+5:302018-02-21T01:24:37+5:30
ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सुमारे ६२ प्रभागांमध्ये केवळ एकाच उमेदवाराने नामांकन सादर केल्याने या प्रभागातील उमेदवार अविरोध निवडून आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सुमारे ६२ प्रभागांमध्ये केवळ एकाच उमेदवाराने नामांकन सादर केल्याने या प्रभागातील उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. १० तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीमध्ये २४ जागांसाठी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.
निवडणूक विभागाने १६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा व २०७ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पोटनिवडणूक जाहीर झालेल्या बहुतांश ग्रामपंचायती धानोरा, अहेरी, भामरागड, सिरोंचा या तालुक्यातील आहेत. नक्षल्यांचा नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना ग्रामपंचायत सदस्य न बनण्याची धमकी देतात. त्यामुळे बहुतांश नागरिक इच्छा असूनही ग्रामपंचायतीचे नामांकन भरत नाही. काही गावांमध्ये ज्या प्रवर्गासाठी जागा आहे. त्या प्रवर्गाचे नागरिकच नाही. त्यामुळे सदर गावात त्या प्रवर्गाचा उमेदवार मिळत नाही. या सर्व कारणांमुळे ग्रामपंचायतीच्या जागा रिक्त राहतात. प्रशासनाला या ग्रामपंचायतीमध्ये वेळोवेळी निवडणूक घेण्याची नामुश्की ओढवते.
यावेळी सुध्दा अत्यंत कमी प्रमाणात नामांकन दाखल झाले. पोटनिवडणूक असलेल्या २०२ जागांवर नामांकनच भरण्यात आले नाही. त्यामुळे या जागा आता रिक्त राहणार आहेत. ६२ जागांसाठी केवळ एकच उमेदवाराने नामांकन भरला. त्यामुळे सदर उमेदवारांना अविरोध घोषीत करण्यात आले आहे.
तालुकानिहाय अविरोध उमेदवार
अविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये देसाईगंज तालुक्यातील बोडधा व सावंगी येथील उमेदवार, आरमोरी तालुक्यातील वडधा, वघाळा व नरचुली येथील उमेदवार, धानोरा तालुक्यातील जांभळी, सुरसुंडी, चिंगली, मोहली, येरकड येथील उमेदवारांचा समावेश आहे. मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली, एटापल्ली तालुक्यातील जारावंडी, कांदोळी, गट्टा, कसनसूर, नागुलवाही, पुरसलगोंदी, जांभीया, चोखेवाडा, कोहका, तोडसा, सिरोंचा तालुक्यातील अंकिसा माल, गुलमकोडा, कोपेला, बेजुरपल्ली, तुमनूर, भामरागड तालुक्यातील इरकडुमे, पल्ले, मन्नेराजाराम या ग्रामपंचायतीमधील प्रभागांचा समावेश आहे.
सार्वत्रिक निवडणूक असलेल्या काही प्रभागांमध्ये सुध्दा सदस्य अविरोध निवडून आले आहेत.
५३ प्रभांगांमध्ये होणार निवडणूक
सहा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीमधील २९ प्रभागांमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. तर १० तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीमध्ये एकूण २४ प्रभागांसाठी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. निवडणुकीसाठी केवळ आता सात दिवस शिल्लक असल्याने निवडणूक व पोलीस विभाग कामाला लागला आहे.