६३० रुग्णांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:29 AM2018-02-03T00:29:55+5:302018-02-03T00:30:09+5:30
धानोरा तालुक्यातील सर्च (शोधग्राम) येथील मॉ दंतेश्वरी रुग्णालयात १ फेब्रुवारी रोजी गुरूवारला पाठ, कंबरदुखी व मणक्यातील आजारांचे निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल ६३० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील सर्च (शोधग्राम) येथील मॉ दंतेश्वरी रुग्णालयात १ फेब्रुवारी रोजी गुरूवारला पाठ, कंबरदुखी व मणक्यातील आजारांचे निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल ६३० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २५४ रुग्णांना मणक्याचा आजार असल्याचे निदर्शनात आले. यातील सहा रुग्णांवर मुंबई आणि नागपूर येथील मणक्यांच्या आजारावरील तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
सर्चचे संस्थापक पद्मश्री डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबीर घेण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात धानाची लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जाते. धानाची रोवणी करताना मजुरांना जास्त वेळ वाकावे लागत असल्यामुळे त्यांच्या कंबरेवर आणि मणक्यावर जास्त प्रमाणात ताण पडतो. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना पाठ, कंबरदुखी व मणक्यातील आजार बळावत असल्याचे सर्चमध्ये वेळोवेळी उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या तपासणीत निदर्शनात आले. सोबतच काही जणांचे कंबरेचे दुखणे वाढून ते पायात जात असल्याचे आणि मणक्यातील पोकळी वाढून नस चिपकत असल्याचेही निदर्शनात आले. ही बाब लक्षात घेत सर्च द्वारे मॉ दंतेश्वरी रुग्णालयात गुरूवारी पाठ, कंबरदुखी व मणक्यातील आजारांचे निदान शिबिर घेण्यात आले.
तब्बल ६३० रुग्णांची या शिबिरात तपासणी करण्यात आली. यामध्ये २५४ रुग्णांना मणक्याचा आजार असल्याचे निदर्शनात आले. यातील सहा रुग्णांवर २ फेब्रुवारी रोजी डॉ.शेखर भोजराज, डॉ.रघु वर्मा, डॉ.शीतल मोहिते, डॉ.प्रेमिक नागड, आणि डॉ. समीर कलकोटवार या तज्ज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्या. भूलतज्ञ म्हणून डॉ.जयश्री कोरे व डॉ.सोनल रंभाळ यांनी काम पाहिले. तर पुण्याच्या काशीबाई नवले रुग्णालयाची फिजिओथेरपिस्ट डॉ.नीरज परमार, डॉ.हेतल देसाई, डॉ.विनिता पामदानी, डॉ.प्रियंवदा हिंगे, डॉ.रुचिता ढगे, डॉ.तृप्ती रंगतानी यांनी रुग्णांना सेवा दिली.
सर्चचे डॉ.वैभव तातावार, डॉ.मृणाल कालकोंडे, डॉ.चैतन्य मलिक, डॉ.दत्ता भलावी, डॉ.प्रियंका, डॉ.मयुरी, डॉ.चेतना यांनी शिबिराची व्यवस्था सांभाळली. सर्चमध्ये यापूर्वी अनेक शिबिर यशस्वीरित्या पार पडले.
उपचारात १०० टक्के उद्दिष्ट गाठण्याचा मानस
स्पाईन फाउंडेशन च्या माध्यमातून १५ वर्षांपासून आम्ही सर्च सोबत काम करीत आहो. जगभरच मणक्याचे आणि पाठीचे आजार वाढत आहे. नक्षलग्रस्त मागास गडचिरोली जिल्ह्यात तर ही मोठी समस्या आहे. यातील ८० टक्के रुग्ण केवळ व्यायाम, आणि औषधोपचाराने बरे होतात. तर १५ टक्के रुग्णांवर येथे शस्त्रक्रिया होते. उरलेल्या ५ टक्के रुग्णांना नागपूर किंवा मुंबई ला पाठविले जाते. पण ८० टक्के रुग्णांचा गावातच उपचार व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे उरलेल्या २० टक्के रुग्णांवर येथेच उपचार होऊ शकेल आणि १०० टक्के उद्दिष्ट गाठता येईल. जास्तीत जास्त लोकांना या उपक्रमात जोडण्याचा मानस स्पाईन फाउंडेशन मुंबईचे डॉ. शेखर भोजराज यांनी यावेळी व्यक्त केला.