खेळण्यांसाठी ६४ लाखांचा निधी

By admin | Published: August 3, 2014 12:07 AM2014-08-03T00:07:06+5:302014-08-03T00:07:06+5:30

कॉन्व्हेंटकडे जाणारा विद्यार्थ्यांचा प्रवाह रोखून अंगणवाडी केंद्रातील प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीमध्ये खेळणी खरेदी करण्यासाठी

64 lakhs funds for toys | खेळण्यांसाठी ६४ लाखांचा निधी

खेळण्यांसाठी ६४ लाखांचा निधी

Next

अंगणवाडी : विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा महिला व बालकल्याण विभागाचा प्रयत्न
गडचिरोली : कॉन्व्हेंटकडे जाणारा विद्यार्थ्यांचा प्रवाह रोखून अंगणवाडी केंद्रातील प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीमध्ये खेळणी खरेदी करण्यासाठी ६४ लाख रूपयांची तरतूद केली आहे.
दिवसेंदिवस पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढत चालला आहे. याचा फटका प्राथमिक शाळांबरोबरच अंगणवाडींनाही बसायला लागला आहे. कॉन्व्हेंटमध्ये नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी सुरू करण्यात आली असून या पूर्व प्राथमिक शिक्षणात ३ ते ६ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कॉन्व्हेंटच्यापूर्वी या वयातील विद्यार्थी अंगणवाडीमध्येच जात होते. कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांना खेळाबरोबरच थोडेफार शिकविलेसुद्धा जाते. तिच पद्धत अंगणवाडीमध्ये सुद्धा आहे. मात्र कॉन्व्हेंटच्या तुलनेत अंगणवाडीमध्ये खेळण्याचे साहित्य कमी असल्याने पालकवर्ग कॉन्व्हेंटला पसंती देत आहेत. परिणामी अंगणवाडीमधील विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत आहे. अंगणवाडी शिक्षिकेलासुद्धा विद्यार्थी शोधून आणावे लागत आहेत.
अंगणवाडीतही विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंटप्रमाणे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांचा अंगणवाडीकडे ओढा वाढविण्याबरोबरच त्यांच्याही शारीरिक व मानसिक क्षमता विकसीत व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीमध्ये ३ ते ४ खेळणी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामध्ये डकरिडर, फोरसेटर चेअर, बोट शेफ सी-सॉ, हॉर्स सी-सॉ आदी खेळण्यांचा समावेश आहे. सदर खेळण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या पूनर्नियोजनात निधी वाढवून मागविण्यात आला होता. यासाठी सर्वसाधारण सभेत निधी वाढवून देण्याचे मान्य केले. तरीही प्रत्येक अंगणवाडीला एवढे साहित्य खरेदी करण्यासाठी ६४ लाखांपेक्षा जास्त पैशांची गरज आहे. मुलांच्या खेळण्यांबरोबरच गरोदर मातांचे वजन करण्यासाठी वेट मशीन खरेदी करण्याचाही निर्णय महिला व बालकल्याण विभागाने घेतला आहे. एवढे साहित्य अंगणवाडीमध्ये उपलब्ध झाल्यास अंगणवाडीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
सध्य:स्थितीतही अंगणवाडीमध्ये काही खेळणी उपलब्ध आहेत. मात्र सदर खेळणी बरेच दिवस झाल्याने मोडकळीस आली आहेत. नवीन खेळण्यांची व्यवस्था जिल्हा परिषद करणार असल्याने पालक वर्गामध्येसुद्धा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 64 lakhs funds for toys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.