जिल्हा सामान्य रूग्णालयात अधिपरिचारीकांची ६४ पदे रिक्त

By admin | Published: July 21, 2016 01:23 AM2016-07-21T01:23:29+5:302016-07-21T01:23:29+5:30

राज्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात अधिपरिचारीका संवर्गातील ६४ पदे रिक्त आहेत.

64 posts of Supervisors vacant in District General Hospital | जिल्हा सामान्य रूग्णालयात अधिपरिचारीकांची ६४ पदे रिक्त

जिल्हा सामान्य रूग्णालयात अधिपरिचारीकांची ६४ पदे रिक्त

Next

गडचिरोली : राज्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात अधिपरिचारीका संवर्गातील ६४ पदे रिक्त आहेत. ही पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस संघटनेने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे केली आहे.
नर्सेस संघटनेने म्हटले आहे की, १९९२ मध्ये गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रूग्णालय स्थापन करण्यात आले. २२६ खाटांची सुविधा येथे असून या रूग्णालयात आंध्रप्रदेश, तेलंगणा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यासह सीमावर्ती भागातले मोठ्या प्रमाणावर रूग्ण दाखल होतात. सद्य:स्थितीत २२६ बेडची सुविधा अत्यंत अपुरी पडत असून येथे दररोज ५०० ते ६०० रूग्ण भरती असतात. बेड क्षमतेपेक्षा जास्त रूग्ण भरती असल्यामुळे रूग्णांना फरशीवर गादी देऊन ठेवण्याची पाळी आस्थापनेवर येत आहे. यामुळे रूग्णांवर सर्वतोपरी उपचारही करण्यात अडचणी येतात. २२६ खाटांच्या या रूग्णालयात अधिपरिचारीका संवर्गातील अधिसेविकेचे एक पद, सहायक अधिसेविकचे एक पद, सिस्टर ट्युटरचे पाच पद, परिसेविकेचे १८ पैकी १३ पद, सार्वजनिक आरोग्य परिचारिकेचे एक पद, मनोविकृती परिचारिकेचे तीन पद व अधिपरिचारिकांचे ९५ पैकी ४० पद रिक्त आहेत. रूग्णांची संख्या पाहता अधिपरिचारिका संवर्गातील काही अधिपरिचारिका वेगवेगळ्या विभागात प्रभारी परिसेविका म्हणून काम करीत आहेत. एका पाळीमध्ये एक परिचारिका ६० ते ८० रूग्णांना बघते. फक्त नाईट आॅफ घेऊन सेवारत राहत असल्याने अधिपरिचारीकाही आजारी पडल्यास या ठिकाणी दुसरी अधिपरिचारीका नसल्याने त्यांना अधिकची सेवा द्यावी लागते. सततच्या कामाच्या ताणामुळे मानसिक संतुलन ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या कुटुंबालाही या अधिपरिचारीका योग्य न्याय देऊ शकत नाही, असेही संघटनेच्या वतीने नमूद करण्यात आले आहे. तेव्हा रूग्णालयात खाटांची संख्या वाढवून त्या प्रमाणात मनुष्यबळ वाढवावे व रिक्त असलेल्या अधिपरिचारीका संवर्गातील पदे त्वरीत भरण्यात यावे, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 64 posts of Supervisors vacant in District General Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.