जिल्ह्यात ६४९ शाळा प्रगत
By admin | Published: January 13, 2017 12:41 AM2017-01-13T00:41:58+5:302017-01-13T00:41:58+5:30
प्रगत शाळा घोषित करण्यासाठी शिक्षण विभागाने २५ निकष ठेवले आहेत. हे २५ निकष करणाऱ्या जिल्हाभरात ६४९ शाळा
शिक्षण विभागाचा दावा : ४९० शाळा नव्याने घोषित
गडचिरोली : प्रगत शाळा घोषित करण्यासाठी शिक्षण विभागाने २५ निकष ठेवले आहेत. हे २५ निकष करणाऱ्या जिल्हाभरात ६४९ शाळा असल्याचा दावा शिक्षण विभागाने करीत या शाळांना प्रगत शाळा म्हणून घोषित केले आहे. उर्वरित १ हजार ३७४ शाळाही प्रगत करण्यासाठी शिक्षण विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
राज्यभरातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने मागील शैक्षणिक सत्रापासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा कार्यक्रम हातात घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत शाळांचा दर्जा सुधारून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमानुसार शाळेमध्ये सकारात्मक बदल झाल्यास तेथील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढल्यास सदर शाळेला प्रगत शाळा म्हणून घोषित केले जाते.
गडचिरोली जिल्ह्यात १ हजार २०४ प्राथमिक व ८१९ उच्च प्राथमिक शाळा आहेत. अशा एकूण जिल्हाभरात २ हजार २३ शाळा आहेत. एप्रिल २०१६ पर्यंत शिक्षण विभागाने १५९ शाळा प्रगत असल्याचे घोषित केले होते. चालू शैक्षणिक वर्षातही शिक्षण विभागाच्या मार्फतीने शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे जिल्हाभरातील शाळांनी शिक्षण विभागाने ठरवून दिलेले २५ निकष पूर्ण केले. त्यामुळे या शाळांनाही डिसेंबर महिन्यात प्रगत घोषित करण्यात आले आहे. डिसेंबर २०१६ अखेर शिक्षण विभागाने ४९० शाळा नव्याने प्रगत असल्याचे घोषित केले. जुन्या १५९ अशा एकूण ६४९ शाळा प्रगत घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये ४२४ प्राथमिक शाळा व २२५ उच्च प्राथमिक शाळांचा समावेश आहे. जिल्हाभरात एकूण २ हजार २३ शाळा आहेत. त्यापैकी केवळ ६४९ शाळा प्रगत झाल्या आहेत. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ३२.८ टक्के एवढे आहे. इतर शाळाही प्रगत करण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभागाला पेलावे लागणार आहे. त्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. (नगर प्रतिनिधी)
प्रगत शाळेचे २५ निकष
शाळा प्रगत म्हणून घोषित करण्यासाठी शिक्षण विभागाने २५ निकष जारी केले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती, शाळा परिसर, रचनावादी साहित्याचा अध्यापनासाठी वापर, विद्यार्थ्यांना पाच गणित संख्या अचूक लिहता व वाचता येणे, शैक्षणिक साहित्याच्या सहाय्याने अचूक बेरीज, वाजबाकी, गुणाकार, भागाकार करता येणे, शाब्दीक उदाहरणे सोडविता येणे, विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील पाच वाक्य लिहता येणे, श्रुतलेखन करणे, पाठ्यपुस्तकातील कविता वैयक्तीकरित्या सादर करता येणे, विद्यार्थ्यास चित्र वाचन करता येणे, शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे आदी निकषांचा समावेश आहे. प्रत्येक निकषाला पाच गुण देण्यात आले आहेत. हे २५ निकष पूर्ण करणाऱ्या शाळेला प्रगत शाळा म्हणून घोषित करावी, असे शिक्षण विभागाचे निर्देश आहेत.
शिक्षण विभागाच्या दबावात शाळा घोषित
गडचिरोली जिल्ह्यात एकूण २ हजार २३ शाळा आहेत. एप्रिल २०१६ पर्यंत जिल्ह्यात एकूण १५९ शाळा प्रगत म्हणून घोषित करण्यात आल्या होत्या. यावर शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राज्यभरातील प्रगत शाळांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला असता, शाळांच्या प्रगतीबाबत त्यांनीही चिंता व्यक्त केली होती व मार्च २०१७ पूर्वी राज्यातील एकूण शाळांच्या ५० टक्के प्राथमिक शाळा, २५ टक्के उच्च प्राथमिक शाळा व २० टक्के माध्यमिक शाळा प्रगत करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर शिक्षण विभागाने शाळा प्रगत म्हणून घोषित करण्यास सुरुवात केली. नव्याने ४९० शाळा शिक्षण विभागाने प्रगत म्हणून घोषित केल्या. मात्र या शाळा खरच २५ निकषांची पूर्तता करतात काय, याबद्दल प्रश्नचिन्हच उपस्थित केला जात आहे.