६६ धान खरेदी केंद्रांचे आदेश
By admin | Published: October 23, 2016 01:39 AM2016-10-23T01:39:22+5:302016-10-23T01:39:22+5:30
आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण ६६ धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश २१ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : १,५१० व १,४७० रूपये मिळणार हमीभाव
गडचिरोली : आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण ६६ धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश २१ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यामुळे धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हलक्या धानाची कापणी आटोपली आहे. तर पुढील २० दिवसानंतर जड धानाची कापणीलाही सुरुवात होणार आहे. अनेक शेतकरी बँका, बचतगट, सावकार यांच्याकडून कर्ज घेऊन धानाची रोवणी करतात. त्यामुळे धान निघल्याबरोबरच धानाची विक्री करून घेतलेले कर्ज परतफेड करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले आहेत. गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ५५ तर अहेरी प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ११ धान खरेदी केंद्र असे एकूण ६६ धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘अ’ दर्जाचा धान १ हजार ५१० रूपये प्रतिक्विंटल व साधारण श्रेणीचा धान १ हजार ४७० रूपये प्रतिक्विंटल जाहीर करण्यात आला आहे. धान विक्रीसाठी आणताना सातबाऱ्याची मूळ प्रत सोबत आणावी, त्याचबरोबर सुकलेले व स्वच्छ धान आणावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.