६७ दिव्यांगांना अर्थसाहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:50 PM2018-03-26T22:50:14+5:302018-03-26T22:50:14+5:30
राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्णयानुसार अपंगांसाठी राखून ठेवावयाच्या तीन टक्के निधी मधून स्थानिक पालिका प्रशासनाच्या वतीने न.प. क्षेत्रातील ६७ लाभार्थ्यांना त्यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणानुसार अर्थसहाय्य खासदार अशोक नेते यांच्या हस्ते देण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्णयानुसार अपंगांसाठी राखून ठेवावयाच्या तीन टक्के निधी मधून स्थानिक पालिका प्रशासनाच्या वतीने न.प. क्षेत्रातील ६७ लाभार्थ्यांना त्यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणानुसार अर्थसहाय्य खासदार अशोक नेते यांच्या हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक चौधरी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पाणी पुरवठा सभापती प्रविण वाघरे, वित्त व नियोजन सभापती संजय मेश्राम, शिक्षण सभापती अनिता विश्रोजवार, नगरसेवक सतीश विधाते, अल्का पोहणकर, लता लाटकर, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, गुलाब मडावी, वैष्णवी नैताम, निता उंदीरवाडे, पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने, भाजपचे पदाधिकारी रवींद्र ओल्लालवार, डॉ. भारत खटी आदी मान्यवर उपस्थित होते.
नगर विकास विभागाच्या २८ आॅक्टोबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार अपंग व्यक्तींसाठी समान संधी, संरक्षण व समान सहभाग कायदा १९९५ चे कलम ४० नुसार नगर परिषद प्रशासन तीन टक्के निधी अपंगाच्या कल्याणासाठी राखून ठेवते. त्यानुसार दरवर्षी न.प. क्षेत्रातील अपंग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य दिले जाते. अपंगांना दिलासा मिळावा, यासाठी ही विशेष तरतूद आहे. धनादेश वाटप कार्यक्रमाला पालिकेचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
अपंगांसाठी विशेष कार्यक्रम घेणार-नेते
याप्रसंगी मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते म्हणाले, अपंगांना अपंग म्हणू नये. त्यांना दिव्यांग असे संबोधावे ही संकल्पना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मांडली. त्यानुसार विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या वतीने अपंगांसाठी अनेक कार्यक्रम घेऊन त्यांच्यासाठीच्या योजनांची जनजागृती करण्यात आली. आपणही अपंगांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी कटिबध्द असून यापुढे जिल्ह्यातील अपंगांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करणार, अशी ग्वाही खासदार नेते यांनी यावेळी दिली. याप्रसंगी नगराध्यक्ष योगीता पिपरे, मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनीही अपंगांच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. अपंगांसाठी पालिका प्रशासनाने नियोजित कार्यक्रम राबवावा, असे मान्यवरांनी आवाहन केले.