६८ लाभार्थ्यांवर फौजदारी कारवाई करणार-मुख्याधिकारी
By admin | Published: May 17, 2017 01:28 AM2017-05-17T01:28:29+5:302017-05-17T01:28:29+5:30
चामोर्शी शहरात शौचालय नसलेल्या कुटुंबांनी शौचालयाच्या बांधकामासाठी नगर पंचायतीकडे अर्ज सादर केले.
पहिला हप्ता : अनुदान घेऊनही शौचालय बांधले नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी शहरात शौचालय नसलेल्या कुटुंबांनी शौचालयाच्या बांधकामासाठी नगर पंचायतीकडे अर्ज सादर केले. त्यानंतर सर्वेक्षण करून नगर पंचायतीतर्फे १ हजार ५६८ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. नगर पंचायतीकडून चेकद्वारे पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम देण्यात आली. मात्र ६८ लाभार्थ्यांनी अद्यापही शौचालयाच्या कामास सुरुवात केलेली नाही. अशा लाभार्थ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती चामोर्शी नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी आर्शिया जुही यांनी लोकमतला दिली आहे.
केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करून जनतेला स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. या उपक्रमाअंतर्गत चामोर्शी शहराला हागदारीमुक्त करण्यासाठी शासनाकडून १२ हजार व नगर पंचायतीकडून ५ हजार असे एकूण १७ हजार रूपयांचे अनुदान शौचालय बांधकामासाठी दिले जात आहे. ज्या लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम केलेले नाही. त्या लाभार्थ्यांनी ३१ मे अखेरपर्यंत शौचालयाचे बांधकाम पूर्ण करावे, असे आवाहन आर्शिया जुही यांनी केले आहे.
चामोर्शी शहरात ज्या कुटुंबधारकांकडे शौचालय नाही, अशा कुटुंबीयांनी नगर पंचायतीकडे अर्ज दाखल करून शौचालय योजनेचा लाभ घ्यावा, शौचालयाचे बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांनी शौचालयाचा वापर नियमित करावा, असेही त्यांनी सांगितले.