७ लाख २ हजार रूपयांचा दंड वसूल
By admin | Published: February 16, 2017 01:52 AM2017-02-16T01:52:28+5:302017-02-16T01:52:28+5:30
तालुक्यातील दोन रेतीघावर धाड टाकून उच्च अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या वाहनाविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.
रेती तस्करीचे प्रकरण : दोन कंत्राटदारांविरुद्ध कारवाई
सिरोंचा : तालुक्यातील दोन रेतीघावर धाड टाकून उच्च अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या वाहनाविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. संबंधित रेती कंत्राटदारावर दंड आकारून यातील दोघांकडून एकूण ७ लाख २ हजार रूपये वसुलीचा आकडा निश्चित झाला आहे. यात नगरम घाट २ च्या कंत्राटदाराकडून २ लाख ९७ हजार तर वडधमच्या कंत्राटदाराकडून ४ लाख ५ हजार रूपये दंड महसूल विभागाला अपेक्षित आहे.
नगरमच्या रेतीने भरलेल्या ११ वाहने तसेच वडधमच्या रेतीने भरलेल्या १६ वाहनांवर ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय नगरम २ च्या ३ व वडधमच्या १ एक्झॉव्हेटरवर पुढील कारवाई करण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी (राजस्व) यांच्या विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले. तसेच नगरमच्या ३० व वडधमच्या १२ अशा एकूण ४२ वाहनाविरूद्ध पुढील कारवाई सुद्ध उच्च अधिकाऱ्यांकडे निर्णयाधीन आहे.
वडधम रेती घाटाचे कंत्राटदार इनगंटी व्यंकटेश्वर हे असून त्यांची व्यंकटेश बोअरवेल ही खासगी कंपनी आहे. सदर रेतीघाट गोदावरी नदीत असून या क्षेत्राचा भूमापन क्र. ७७ च्या पश्चिमेस आहे. यातील ४ हेक्टर ९५ आर जागेतून ५२ हजार ४७३ ब्रास रेतीची उचल करणे अपेक्षित आहे. या घाटाची अंतिम अपसेट किंमत २ कोटी ९८ लाख ९ हजार ५०० रूपये आहे. याशिवाय अंकिसा, मालगुजारी व मुक्कीडगुट्टा घाटाचे कंत्राटही व्यंकटेश्वरच्याच नावे आहेत. अंकिसा घाट पेंटिपाका राजस्व निरीक्षक मंडळ तर मुक्कीडगुट्टा घाट आसरअल्ली मंडळाअंतर्गत समाविष्ट आहे.