७ लाख ६५ हजारांची दारू जप्त
By admin | Published: October 9, 2016 01:46 AM2016-10-09T01:46:16+5:302016-10-09T01:46:16+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली...
कालिनगर व गडचिरोलीत धाडी : आष्टी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीची कारवाई
गडचिरोली/आष्टी : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व आष्टी पोलीस ठाण्याच्या पथकाने गडचिरोली शहर व कालिनगर येथे धाड घालून ७ लाख ६५ लाख रूपयांची दारू शनिवारी दिवसभरात जप्त केली.
गडचिरोली येथे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनात आठवडी बाजारात लता अनिल चापले हिच्याकडून देशी कंपनीच्या २० हजार रूपये किमतीच्या ४०० निपा, हनुमान वॉर्डातून दीपक रमेश भुरले याच्याकडून २७ हजार रूपये किमतीच्या ७३ विदेशी व १७५ देशी दारूच्या निपा जप्त करण्यात आल्या. सदर आरोपींविरूद्ध मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुनील इंगळे, पोलीस हलवादार बोरकर, कान्हुजी गुरनुले, प्रमोद वाळके, दुर्गा साखरे, वृषाली चव्हाण, प्रशांत पातकमवार यांनी पार पाडली.
आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कालिनगर परिसरात चारचाकी वाहनाने अवैध दारूविक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आष्टी पोलिसांनी कालिनगर- गांधीनगर मार्गावर पाळत ठेवून ७ लाख १८ हजार रूपयांची दारू जप्त केली.
या प्रकरणी आरोपी दिनेश सपन बई रा. कालिनगर याला अटक करण्यात आली. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सदर घटना शनिवारी पहाटे ३ ते ७ वाजताच्या सुमारास घडली. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी दामदेव मंडलवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, येलावार, गौरकार, पिंकू झाडे यांनी पार पाडली.
आरमोरी पोलिसांनी शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता वैरागड डांबरी मार्गावरील वासाळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून दुचाकीसह २९ हजार रूपये किमतीची मोहफुल दारू जप्त केली. या प्रकरणी आरोपी महेश रमेश कोल्हे, भाऊराव गंगाधर खोब्रागडे रा. आरमोरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्या आला. त्यांच्याकडून ४० लिटर मोहफुल दारू जप्त केली.