मोहझरीतील ७ क्विंटल मोहफूल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:34 AM2021-04-12T04:34:54+5:302021-04-12T04:34:54+5:30
गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी येथे पोलीस व मुक्तिपथने कारवाई करीत १५ दारूविक्रेत्यांच्या घराची तपासणी करून ७ क्विंटल मोहफूल ...
गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी येथे पोलीस व मुक्तिपथने कारवाई करीत १५ दारूविक्रेत्यांच्या घराची तपासणी करून ७ क्विंटल मोहफूल जप्त केले, तसेच एकाच्या घरात आढळलेला एक क्विंटल मोहसडवा नष्ट केला आहे. याप्रकरणी दोन दारूविक्रेत्यांवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.
गडचिरोली पोलीस ठाणे व मुक्तिपथ तालुका चमूने तालुक्यातील दारू विक्री करणाऱ्या गावांची यादी तयार केली होती. या यादीत मोहझरी गावाचासुद्धा समावेश आहे. येथे अवैध दारूविक्रेत्यांची संख्या अधिक आहे. यामुळे परिसरातील गावे त्रस्त झाली आहेत. गडचिरोलीचे ठाणेदार दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त कारवाई करून गावातील अवैध दारू विक्रेत्यांच्या घरांची तपासणी केली असता दारू गाळण्याच्या कामी असलेला जवळपास सात क्विंटल मोहफूल साठा आढळून आला, तर एका घरी मिळून आलेला एक क्विंटल मोहसडवा नष्ट करण्यात आला आहे. सोबतच दोन दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत पुन्हा दारूविक्री न करण्याची तंबी देण्यात आली आहे. ही कारवाई एएसआय मुनीश्वर मेश्राम, बीट अंमलदार भुवनेश्वर गुरनुले, पोलीस हवालदार रायपुरे व होमगार्डच्या पथकाने केली आहे. यावेळी मुक्तिपथ अभियानाचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, तालुका संघटक अमोल वाकूडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम, गणेश कोलगिरे, पोर्ला ग्रा.पं. सदस्य भास्कर लाडवे, नवरगावचे पोलीस पाटील राजहंस जांभूळकर, उपसरपंच आशा भोयर आदींची उपस्थिती होती.