जिल्ह्यातील ७ हजार ३७७ विद्यार्थ्यांना अपंगत्व
By admin | Published: November 4, 2014 10:39 PM2014-11-04T22:39:23+5:302014-11-04T22:39:23+5:30
आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान जिल्ह्यातील ७ हजार ३७७ विद्यार्थ्यांना अपंगत्व असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील ४०४ विद्यार्थ्यांवर यावर्षी शिक्षण
गडचिरोली : आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान जिल्ह्यातील ७ हजार ३७७ विद्यार्थ्यांना अपंगत्व असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील ४०४ विद्यार्थ्यांवर यावर्षी शिक्षण विभागाच्यावतीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना साहित्याचेही वितरण करण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण २ हजार ८१ शाळा असून त्यामध्ये सुमारे २ लाख २७ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना दैनंदिन शिक्षण देण्याबरोबरच त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न केले जातात. त्यांतर्गतच शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांची दरवर्षी आरोग्य तपासणी करण्यात येते. आरोग्य तपासणीदरम्यान सुमारे ७ हजार ३७७ विद्यार्थ्यांना अपंगत्व असल्याचे निष्पन्न झाले आहे. अपंग विद्यार्थ्यांची जबलपूर येथील विशेष तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना आवश्यक औषधोपचार सुचविण्यात आला. यावर्षी ४०४ विद्यार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मागील वर्षी ४३ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अपंग विद्यार्थ्यांना यावर्षी ट्रायसिकल, व्हीलचेअर, श्रवणयंत्र, चष्मे आदी सुमारे १० लाख रूपयांची साहित्य वितरित केले जाणार आहेत.
भारतात पोलिओ मोहिमेला सुरूवात होण्यापूर्वी पोलिओ रोगाने अपंग असलेल्या बालकांची संख्या सर्वाधिक होती. मात्र मागील पाच वर्षांपासून पोलिओ मोहीम संपूर्ण देशात राबविली जात आहे. त्यामुळे पोलिओग्रस्तांची संख्या कमी झाली आहे. मात्र पर्यावरणातील बदलांमुळे डोळे कमजोर असणे, श्रवणाचे दोष वाढत असल्याचे करण्यात येणाऱ्या आरोग्य तपासणीदरम्यान दिसून आले आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. गडचिरोली जिल्ह्यात कुपोषणामुळेही विद्यार्थ्यांमध्ये अपंगत्व जास्त आढळून येते. (नगर प्रतिनिधी)