७० हजारांच्या सागवानी पाट्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 09:53 PM2018-11-25T21:53:50+5:302018-11-25T21:54:38+5:30
सिरोंचा वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या कासरअल्ली परिसरात लपवून ठेवलेल्या सागवानी लाकडाच्या पाट्या वन विभागाच्या पथकाने जप्त केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या कासरअल्ली परिसरात लपवून ठेवलेल्या सागवानी लाकडाच्या पाट्या वन विभागाच्या पथकाने जप्त केल्या आहेत.
कासरअल्ली जंगल परिसरात भूखंड क्रमांक १२ मध्ये सागवानी पाट्या लपवून ठेवल्याची गोपनिय माहिती वन विभागाला प्राप्त झाली. कासरअल्लीचे वनक्षेत्र सहायक एल. एम. शेख यांच्या मार्गदर्शनात वन कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबविली असता, जंगलात ७० हजार रूपये किमतीच्या सागवानी पाट्या आढळून आल्या. सदर पाट्या वन विभागाच्या कर्मचाºयांनी जप्त केल्या आहेत. ही कारवाई वनरक्षक एम. बी. शेख, व्ही. एच. मेश्राम, डी. जी. भुरसे, ए. आर. बुध्दावार, ए. एस. नैताम यांनी केली. वन विभागाचे कर्मचारी वनतस्करांचा शोध घेत आहेत.
आसरअल्ली, रंगय्यापल्ली, कारसपल्ली, अंकिसा, झिंगानूर, कोर्ला, टेकडा, रेगुंठा या परिसरातील सागाचा दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे या सागाची मोठ्या प्रमाणात तेलंगणात तस्करी होते. गोदावरी, प्राणहिता नदी मार्गे साग नेला जातो. तस्करी रोखण्याचे मोठे आवाहन वन विभागासमोर आहे.
सिरोंचातील सागवानाचा दर्जा चांगला असल्याने तेलंगणा राज्यात या सागाची विशेष ओळख आहे. त्यामुळे त्यापासून बनविलेल्या वस्तूंना अधिकची किंमत उपलब्ध होते. लग्नसराईला आता सुरूवात होणार असल्याने लाकडी वस्तूंची मागणी वाढणार आहे. त्यामुळे सागवानाच्या तस्करीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.