सुंदरनगर ग्रा.पं.मध्ये ७० टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:39 AM2021-05-11T04:39:05+5:302021-05-11T04:39:05+5:30
सुंदरनगर ग्रामपंचायत अंतर्गत सहा गावांचा समावेश आहे. तीन गावांत ४५ वर्षांच्यावर वयोगटातील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. ...
सुंदरनगर ग्रामपंचायत अंतर्गत सहा गावांचा समावेश आहे. तीन गावांत ४५ वर्षांच्यावर वयोगटातील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.
ग्रामीण भागात लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ग्रामपंचायतीला पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुषंगाने ६ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय सुंदरनगर येथे बैठक घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करून नियोजन करण्यात आले. ९ मे रविवारी सुट्टी असतानासुद्धा भवानीपूर भगतनगर, तरुणनगर आदी तीन गावात १०० टक्के लसीकरण सुद्धा पूर्ण करून घेण्यात आले. उर्वरित तीन गावे सुंदरनगर, खुदिरामपल्ली व श्रीनगर येथे सुद्धा १०० टक्के लसीकरण होण्याच्या मार्गावर आहे.
तत्पूर्वी सुंदरनगरच्या सरपंच जया परितोष मंडल यांच्या हस्ते भवानीपूर येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसरपंच संजीव सरकार, गटविकास अधिकारी वाय. पी. लाकडे, सहायक प्रशासक अधिकारी एम. टी. मत्ते, सचिव एस. एस. तोकलवार आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर तसेच लाभार्थी उपस्थित होते. कोरोनाच्या लसीकरणबाबत गैरसमज दूर करून नागरिकांनी सुंदरनगर ग्रामपंचायतच्या लसीकरणाचा आदर्श समोर ठेवावा, असे आवाहन गटविकास अधिकारी वाय. पी. लाकडे यांनी केले आहे.
(कोट)
ग्रामपंचायत सुंदरनगरने पुढाकार घेऊन तीन गावांत ४५ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करून घेतले आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी त्वरित लस उपलब्ध झाल्यास १० दिवसांत लसीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल.
- जया मंडल, सरपंच, सुंदरनगर