वनौषधीच्या उपयोगीतेवर ७० वैदूंचे विचारमंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 01:10 AM2019-02-25T01:10:15+5:302019-02-25T01:14:52+5:30
आरोग्य प्रबोधिनीद्वारे तिसरे गोंडवाना वैदू साहित्य संमेलन देसाईगंज येथील सिंधू भवनात २३ व २४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील ७० वैदूंनी सहभाग घेऊन डोंगरदऱ्यात व खेड्यापाड्यात असलेल्या औषधी वनस्पतींची माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : आरोग्य प्रबोधिनीद्वारे तिसरे गोंडवाना वैदू साहित्य संमेलन देसाईगंज येथील सिंधू भवनात २३ व २४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील ७० वैदूंनी सहभाग घेऊन डोंगरदऱ्यात व खेड्यापाड्यात असलेल्या औषधी वनस्पतींची माहिती दिली.
संमेलनाचे उद्घाटन आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते वटवृक्षाच्या रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देसाईगंज वन विभागाचे उपवनसंरक्षक अ.वि. विवरेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून वैदू जयपाल ढवळे, नामदेव कुसराम होते. दोन दिवस चाललेल्या या संमेलनात दुर्मिळ औषधी वनस्पतींचे संवर्धन या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. आयुर्वेदिक औषध कंपन्यांचे स्टॉल लावण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार कृष्णा गजबे यांनी वृध्द कलावंतांच्या धरतीवर वृध्द वैदूंना मानधन देण्यासाठी शासनाकडे आपण पाठपुरावा करू. सर्व वैदूंनी आरोग्य प्रबोधिनीच्या माध्यमातून निवेदन तयार करावे. शासन दरबारी वैदूंच्या मागण्या मांडू, असे आश्वासन दिले. अध्यक्षीय स्थानावरून बोलताना उपवनसंरक्षक विवरेकर म्हणाले, पारंपारिक वैदूंची भूमिका प्रकृती स्वास्थासाठी फार महत्त्वाची आहे. ग्रामीण आदिवासी भागातील नागरिकांना डॉक्टरपेक्षाही वैदू जवळचा वाटतो. याचे कारण म्हणजे, वैदू हा सुखदु:खाशी एकरूप असतो. औषधी घेताना आहार, आरोग्य, पथ्य या संबंधी वैदूची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बदलत्या काळात वैदूंनी नुसतेच जंगलावर निर्भर राहण्यापेक्षा वनौषधींची लागवड आपल्या परिसरात तसेच घरासभोवताल करावी, यातून उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होईल. नागरिकांनाही उपचार मिळण्यास मदत होईल. वैदूंच्या खुल्या सत्रात वैदूंनी बदलत्या काळात औषधोपचार करताना येणारे अनुभव व आव्हाने यावर मत व्यक्त केले. विष्णू दुनेदार यांनी जैव विविधता संवर्धनात वैदूंच्या योगदानाविषयी माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. सूर्यप्रकाश गभने, संचालन व्ही. दुनेदार, तर आभार अर्चना गभने यांनी मानले. यशस्वीतेसाठी आरती पुराम, अल्का कुबडे, जितेंद्र सुकारे, वैभव बुराडे, मनिष वझाडे, राधेश्याम मारबते यांनी सहकार्य केले.
औषधी वनस्पतींचे संगोपन गरजेचे
गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती उपलब्ध आहेत. या औषधी वनस्पतींचे महत्त्व ग्रामीण व दुर्गम भागातील वैदूंनाच माहित आहे. त्यांच्याकडील ज्ञान पिढ्यानपिढ्या चालत आले आहे. मात्र आधुनिक वैद्यकशास्त्रातील संशोधनाचा फार मोठा फटका वैदू व औषधी वनस्पतीला बसला आहे. मेडिकल मध्ये मिळणारी औषधी ही रासायनिक द्रव्यांपासून बनली राहते. या औषधीमुळे रोग जरी लवकर बरा होत असला तरी त्याचे काही दुष्परिणामही आहेत. मात्र वनस्पती औषधीचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाही. आयुर्वैदामध्ये औषधी वनस्पतींचे महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे औषधी वनस्पतींचे संगोपन ही काळाची गरज असल्याची प्रतिक्रिया उपस्थित वैदूंनी व्यक्त केली.