लोकअदालतीत तब्बल सात हजार प्रकरणांची सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 05:00 AM2021-12-12T05:00:00+5:302021-12-12T05:00:20+5:30
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे अध्यक्ष यु. बी. शुक्ल यांनी लोकअदालतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा वेळ वाचतो, त्यांचे पैसे वाचतात, तसेच न्यायालयाचाही कामाचा ताण कमी होत असल्याचे मत व्यक्त केले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अशा लोकन्यायालयात सहभाग नोंदवून आपसी तडजोड करण्यास उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी न्या. शुक्ल यांनी केले. यावेळी विधिसेवा प्राधिकरणचे सचिव डी. डी. फुलझेले यांनी समझोता केलेल्या पक्षकारांचे आभार मानून त्यांचे अभिनंदनही केले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विधिसेवा प्राधिकरण आणि गडचिरोली जिल्हा विधिसेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले होते. यात न्यायालयात दाखल असलेल्या ७५० प्रलंबित प्रकरणांसह जवळपास ६,५०० दाखलपूर्व प्रकरणांवर सुनावणी करण्यात आली. त्यात ८९ प्रलंबित तर ४१४ दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे अध्यक्ष यु. बी. शुक्ल यांनी लोकअदालतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा वेळ वाचतो, त्यांचे पैसे वाचतात, तसेच न्यायालयाचाही कामाचा ताण कमी होत असल्याचे मत व्यक्त केले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अशा लोकन्यायालयात सहभाग नोंदवून आपसी तडजोड करण्यास उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी न्या. शुक्ल यांनी केले. यावेळी विधिसेवा प्राधिकरणचे सचिव डी. डी. फुलझेले यांनी समझोता केलेल्या पक्षकारांचे आभार मानून त्यांचे अभिनंदनही केले. न्यायालयात दाखल प्रलंबित प्रकरणांमध्ये प्रामुख्याने कौटुंबिक, आर्थिक वाद तसेच ज्यावर आपसी तडजोड होऊ शकते अशा फौजदारी तक्रारी ठेवण्यात आल्या होत्या. सर्वसामान्य लोकांना अचानक वादविवाद, तक्रारीमुळे अनेकदा न्यायालयाची पायरी चढावी लागते. अशावेळी गोरगरीब, गरजू लोकांना याचा सर्वाधिक फायदा होतो. यामध्ये विविध बँकांमधील, वीज वितरण कार्यालयातील प्रलंबित प्रकरणे, वाहतूक विभागाच्या दंडात्मक कारवाईची प्रकरणे अशा लोकअदालतीमध्ये सोडविण्यात आली.
आपसी समझोता झालेल्या कुटुंबांचा सन्मान
- कौटुंबिक वादविवादामध्ये आपसी समझोता झाल्यानंतर जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तसेच सचिव यांनी काही कुटुंबीयांचा साडी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच पुढील सुखी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. प्रकरण तडजोडीतून मिटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
२ कोटी १२ लाखांच्या थकबाकीची वसुली
या लोकअदालतीत तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी मामल्यांसह इतर मामल्यांमध्ये ८९ प्रलंबित आणि ४१४ दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. त्यात २ कोटी १२ लाख ६६ हजार ९५० रुपयांची वसुली संबंधितांना मिळाली. किरकोळ स्वरूपाच्या मामल्यांकरिता स्पेशल ड्राईव्हद्वारे २६ प्रकरणे निकाली काढली.