७१ शेतकरी देणार विद्यापीठास जमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:33 AM2017-09-13T00:33:04+5:302017-09-13T00:33:04+5:30
स्थानिक गोंडवाना विद्यापीठाला २०० एकर जमिनीची आवश्यकता असली तरी १५० एकर जमीन मिळाल्यास विद्यापीठ विकासाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.
दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाला २०० एकर जमिनीची आवश्यकता असली तरी १५० एकर जमीन मिळाल्यास विद्यापीठ विकासाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाच्या आवाहनानुसार चर्चेअंती तब्बल १३५ एकर खासगी जमीन देण्यास पुलखल व अडपल्ली (गोगाव) येथील शेतकºयांनी अनुकूलता दाखविली असून या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाला लेखी स्वरूपात संबंधित शेत जमीन मालकांचे संमतीपत्र प्राप्त झाले आहेत. सदर खासगी जमीन अधिग्रहित करण्यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने हालचाली वाढविल्या आहेत.
चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी २ आॅक्टोबर २०११ रोजी स्थापन झालेल्या गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाशी एकूण २३८ महाविद्यालये गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित आहेत. विद्यापीठात प्रशस्त ग्रंथालय, शाखानिहाय अभ्यासक्रमांचे स्वतंत्र विभाग, वसतिगृह, प्रशासकीय भवन, कार्यालयीन विभाग, महाविद्यालय कॅम्पस व इतर सोयीसुविधा करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाला १५० एकर जागेची नितांत आवश्यकता आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून विद्यापीठाला जागा मिळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने जिल्हा प्रशासनासह शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. येथील शैक्षणिक विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने २०० एकर झुडपी जंगलाच्या जागेची वन विभागाकडे मागणी करून तसा प्रस्ताव सादर केला होता. मात्र हा प्रस्ताव वन विभागाने नामंजूर केला. त्यानंतर ही विद्यापीठाने इतर विभागाची शासकीय व खासगी जमीन शोधण्याचे काम युध्दपातळीवर सुरूच ठेवले. खासगी जमीन विकू इच्छिणाºया शेतकºयांनी विद्यापीठाला संमतीपत्र द्यावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले होते. त्यानुसार पुलखल येथील ५८ शेतकºयांनी १०० एकर जमीन विद्यापीठाला देण्याबाबतचे संमतीपत्र सादर केले आहे. याशिवाय अडपल्ली, गोगाव परिसरात जवळपास २४६ खासगी जमीन महामार्गालगत आहे. या भागातील १३ शेतकºयांनी आपली ३५ एकर जमीन देण्याबाबतचे संमतीपत्र विद्यापीठाला दिले आहे. या संदर्भात प्रशासनाची शेतकºयांशी चर्चाही झाली आहे.
बाजारभावाच्या चारपट मिळेल जमिनीचा मोबदला
गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाला आवश्यक असणारी जागा देण्यास शेतकºयांच्या बैठकींमध्ये बराच खल झाला. यात शेतकºयांनी जमिनीच्या किमतीची मागणी केली. त्यानुसार जमीन देण्यास शेतकºयांनी सहमती दर्शविली. जमीन देण्याबाबतचे संमतीपत्र देणाºया संबंधित जमीन मालकाला भूमिअधिग्रहणाच्या नियमानुसार बाजार भावाच्या चारपट किंमत संबंधित खासगी जमिनीला विद्यापीठ प्रशासना अंतर्गत शासनाकडून मिळणार आहे. जमीन खरेदीसाठी विद्यापीठ प्रशासन शासनाकडे मागणी करणार आहे.
२० हेक्टर आर शासकीय जमिनीचे प्रस्ताव सादर
गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने गडचिरोली शहराच्या परिसरात मोकळ्या स्वरूपात असलेल्या शासकीय जमिनीचा शोध घेतला. शासकीय जमीन रिकामी असल्याबाबतची खात्री झाल्यानंतर सदर जमीन विद्यापीठाला मिळावी या संदर्भातची मागणी विद्यापीठ प्रशासनाने जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे केली आहे.
पुलखल कनेरी येथील १२.५६ हेक्टर आर व पुलखल येथील ७.८६ हेक्टर आर अशी एकूण २०.४२ हेक्टर आर शासकीय जमीन विद्यापीठाला उपलब्ध करून देण्यात यावी, याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला आहे. या संदर्भात कुलगुरू व कुलसचिवांकडून जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आहे.