लोकअदालतीत ७३ प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 01:00 AM2018-02-11T01:00:54+5:302018-02-11T01:01:10+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १० फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ७३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १० फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ७३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.
सर्व न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणांची व विविध संस्थेतील, बँकेतील दाखलपूर्व प्रकरणांची संख्या कमी करण्याकरिता संपूर्ण देशात महालोकअदालतीचे आयोजन केले जाते. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत २९ लाख ४८ हजार २२५ रूपयांचे १५ प्रकरणे व ३४ लाख १ हजार ६२९ रूपयांची ५८ प्रकरणे असे एकूण ६३ लाख ४९ हजार ८५४ रूपयांचे ७३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय मेहरे यांच्या नियंत्रणात दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव बी. एम. पाटील यांच्या देखरेखीत लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एम. पदवाड यांनी पॅनल क्रमांक १ वर पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. दिवाणी न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी पॅनल क्रमांक २ चे प्रमुख तर सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एन. पी. वासाडे यांनी पॅनल क्रमांक ३ चे प्रमुख म्हणून काम पाहिले.