१६ ग्रामपंचायतींमध्ये सरासरी ७४.९४ टक्के मतदान; मंगळवारी मतमाेजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2022 04:08 PM2022-10-17T16:08:55+5:302022-10-17T16:11:05+5:30
आठ तालुक्यांत निवडणुक; उत्सुकता अन् धाकधूक वाढली
गडचिरोली : जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील एकूण १६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १६ ऑक्टोबर रोजी रविवारला मतदानाची प्रक्रिया घेण्यात आली. या १६ ग्रामपंचायतीमध्ये अंदाजे सरासरी ७४. ९४ टक्के मतदान झाले आहे.
एटापल्ली तालुक्यात तीन मतदान केंद्रांवर स्त्री व पुरुष मिळून एकूण मतदार १०८९ असून ७१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ६५.७५ टक्के एवढी आहे. देसाईगंज तालुक्यात सहा मतदान केंद्रांत स्त्री व पुरुष यांचे एकूण मतदार ३२१८ असून २५२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी ७५.५६ टक्के एवढी आहे. गडचिरोली तालुक्यात तीन मतदान केंद्रांत स्त्री व पुरुष मिळून एकूण मतदार १८६२ असून १५५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी ८३.४० टक्के एवढी आहे.
आरमोरी तालुक्यात तीन मतदान केंद्रांत स्त्री व पुरुष मिळून एकूण मतदार १००३ असून ८५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी ८५.३४ टक्के आहे. भामरागड तालुक्यात बारा मतदान केंद्रांवर एकूण ४६०६ मतदारांपैकी २९८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी ६४.८१ टक्के आहे. धानोरा तालुक्यात नऊ मतदान केंद्रांवर एकुण २३४७ मतदारांपैकी १८६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी ७९.२९ टक्के आहे.
चामोर्शी तालुक्यात नऊ मतदान केंद्रांवर एकुण मतदार संख्या ७१८९ आहे. यापैकी ५४४१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी ७५.६९ टक्के आहे. अहेरी तालुक्यात सहा मतदान केंद्रांवर निवडणूक पार पडली. यामध्ये २६८५ मतदारांपैकी २०४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी ७६.२० टक्के आहे.
आठही तालुक्यांत मतदान सकाळी ७.३० वाजता ते दुपारी ३ वाजतापर्यंत झाले. एकत्रित अंदाजित आकडेवारी घेतली असता झालेली एकूण मतदार संख्या २३ हजार ९९९ एवढी आहे. यापैकी १७ हजार ९८६ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
या ग्रामपंचायतीमध्ये झाली निवडणूक
एटापल्ली तालुक्याच्या काेहका, देसाईगंज तालुक्यांतील सावंगी, गांधीनगर, गडचिराेली तालुक्यातील पारडी कुपी, आरमाेरी तालुक्यातील जांभळी, भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम, येचली, मिरगुळवंचा व लाहेरी आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तसेच धानाेरा तालुक्यातील ईरूपटाेला, मुरगाव, मुज्यालगाेंदी, चामाेर्शी तालुक्यातील घाेट, दुर्गापूर आणि अहेरी तालुक्यातील आरेंदा व खांदला आदी ग्रामपंचायतींमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली.