पूरग्रस्त शेतकऱ्यांना 75 काेटींचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 11:01 PM2022-10-14T23:01:05+5:302022-10-14T23:02:24+5:30
काही शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले हाेते, तर काहींचे राेवणे झाले हाेते. सतत तीन ते चारवेळा पुराचे पाणी शेतात शिरल्याने पीक पूर्णपणे वाहून गेले. काही शेतकऱ्यांच्या धानाच्या बांध्यांमध्ये पुराचा गाळ साचला. या गाळात धान पीक नष्ट झाले. काही शेतकऱ्यांना दाेन ते तीनवेळा धानाची राेवणी करावी लागली. नुकसानग्रस्त शेतकरी निधीची प्रतीक्षा करीत हाेते. आठ दिवसांपूर्वी शासनाने निधी उपलब्ध करून दिला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : जुलै महिन्यात आलेल्या पुरामुळे गडचिराेली जिल्ह्यातील शेतीचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांच्या शेतात दाेन ते तीनवेळा पुराचे पाणी शिरले. या शेतकऱ्यांना सुमारे ७५ काेटी २९ लाख रुपयांची मदत शासनामार्फत प्राप्त झाली आहे. मदतीचे वितरण तहसीलमधून केली जात आहे.
पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीलाच पावसाने जिल्ह्याला झाेडपून काढले. तसेच मध्य प्रदेश व विदर्भातही मुसळधार पाऊस झाल्याने धरणांचे पाणी वैनगंगा नदीत साेडण्यात आले. याच कालावधीत प्राणहिता व गाेदावरी नदीलाही पूर आला. खरीप पिकांची नुकतीच पेरणी झाली हाेती आणि पुराचा फटका बसला.
काही शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले हाेते, तर काहींचे राेवणे झाले हाेते. सतत तीन ते चारवेळा पुराचे पाणी शेतात शिरल्याने पीक पूर्णपणे वाहून गेले. काही शेतकऱ्यांच्या धानाच्या बांध्यांमध्ये पुराचा गाळ साचला. या गाळात धान पीक नष्ट झाले. काही शेतकऱ्यांना दाेन ते तीनवेळा धानाची राेवणी करावी लागली.
नुकसानग्रस्त शेतकरी निधीची प्रतीक्षा करीत हाेते. आठ दिवसांपूर्वी शासनाने निधी उपलब्ध करून दिला. या निधीची वितरण तहसील स्तरावरून केले जात आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमासुद्धा झाली आहे. काही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने त्यांच्या खात्यात रक्कम जमा हाेण्यास अडचण जात आहे.
काही शेतकऱ्यांच्या येरझारा
काही शेतकऱ्यांच्या बँक खात्याची समस्या असल्याने त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. असे शेतकरी बँक, तहसील कार्यालय किंवा तलाठी यांच्याकडे येरझारा मारत असल्याचे दिसून येत आहेत. मदतीची रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. अशा शेतकऱ्यांची दिवाळी गाेड हाेणार आहे.
चामाेर्शी तालुक्याला सर्वाधिक मदत
चामाेर्शी हा जिल्ह्यातील सर्वात माेठा तालुका आहे. या तालुक्याच्या सीमेवरून वैनगंगा नदी वाहते. वैनगंगेच्या अनेक उपनद्या आहेत. या नद्यांना पूर आल्याने चामाेर्शी तालुक्यातील ११ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचे नुकसान झाले. या तालुक्यातील शेतकऱ्यांना २४ काेटी १६ लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना दुप्पट लाभ
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने २२ ऑगस्ट २०२२ राेजी शासन निर्णय काढला आहे. यात दुप्पट मदत दिली जाणार आहे.
काेरडवाहू शेतीचे नुकसान झाल्यास पूर्वी प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रुपये एवढी मदत दिली जात हाेती. त्यात वाढ करून यावर्षी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये देण्यात आले.
ओलिताखालील शेतीचे नुकसान झाल्यास पूर्वी प्रतिहेक्टरी १३ हजार ५०० रुपये एवढी मदत दिली जात हाेती. त्यात वाढ करून यावर्षी प्रतिहेक्टरी २७ हजार रुपये देण्यात आले.
पूर्वी दाेन हेक्टरपर्यंतच मदत दिली जात हाेती. आता मर्यादा तीन हेक्टरपर्यंत वाढविण्यात आली.