७५ टक्के शेतकरी शेततळ्यांपासून वंचित
By admin | Published: June 3, 2017 01:06 AM2017-06-03T01:06:06+5:302017-06-03T01:06:06+5:30
राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत ‘मागेल त्याला शेततळे’ देण्याची योजना आणली. पण शेततळे मागणाऱ्या
‘मागेल त्याला शेततळे’ योजना : ४२४८ शेतकऱ्यांचे अर्ज, प्रत्यक्षात ९९३ कामेच पूर्ण
मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत ‘मागेल त्याला शेततळे’ देण्याची योजना आणली. पण शेततळे मागणाऱ्या २५ टक्केही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे योजनेचे नावच फसवे असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे.
२०१६ पासून सुरू केलेल्या या योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील ४२४८ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र एकीकडे कुणीही यावे आणि योजनेचा लाभ घ्यावा असे दर्शविले जात असताना प्रत्यक्षात केवळ १५०० शेततळ्यांचा लक्ष्यांक जिल्ह्यासाठी ठेवण्यात आला. त्यातही आतापर्यंत ९९३ शेततळ्यांचेच काम पूर्णत्वास गेले आहे. त्या शेतकऱ्यांना ३ कोटी ६६ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. अजून ११४७ शेततळ्यांचे काम सुरू आहे. मात्र २१०८ शेतकरी शेततळ्यांच्या लाभासाठी अजूनही प्रतीक्षेत आहेत.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भाजीपाल्यासह इतर पिकांच्या सिंचनासाठी पाणी मिळावे म्हणून प्रतिलाभार्थी ५० हजार रुपये अनुदानातून शेततळे खोदून दिले जात आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न किंवा प्रवर्गाची कोणतीही अट नाही. केवळ ज्याने आधी अर्ज केला त्याला आधी लाभ या नियमानुसार आतापर्यंत ४२४८ शेतकऱ्यांनी शेततळे खोदण्यासाठी आॅनलाईन अर्ज केले. मात्र मुळात लक्ष्यांकच कमी ठेवल्यामुळे या शेतकऱ्यांना शेततळ्याचा लाभ मिळण्यासाठी किती महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल याचे उत्तर कोणाकडे नाही.
काही शेतकरी प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतरही पैशाअभावी शेततळे पूर्ण करू शकलेले नाहीत. खोदलेल्या शेततळ्यातील पाणी जमिनीत न मुरता तळ्यात साचून राहण्यासाठी त्याला अस्तरीकरण करण्याचा पर्यायही आहे. मात्र त्यासाठी लागणारा खर्च शेतकऱ्यांनाच करायचा आहे. वास्तविक शासनाने आणखी थोडे पैसे खर्च करून तलावाला अस्तरीकरण करून दिल्यास शेतकऱ्यांना त्या पाण्याचा योग्य उपयोग घेणे शक्य होणार आहे. सर्वाधिक ८६६ अर्ज चामोर्शी तालुक्यातून आले आहेत. मात्र तिथे फक्त १२० शेततळ्यांचा लक्ष्यांक ठेवला आहे.
आठ दिवसांत अनुदान देण्याचा उडतोय फज्जा
या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्याला शेततळ्याची मंजुरी मिळाल्यानंतर कृषी सहायक प्रत्यक्ष शेतावर जाऊन जागेची मोजणी करतात. त्यात २० बाय २० मीटर आकार आणि ३ मीटर खोल किंवा २५ बाय २५ मीटर आकार आणि ३ मीटर खोल असे दोन पर्याय आहेत. कोणताही पर्याय निवडला तरी अनुदान मात्र ५० हजार रुपयेच मिळतात.
४यात आधी शेततळ्याचे काम पूर्ण करून शेतकऱ्याने तसे पत्र तालुका कृषी अधिकाऱ्यांना द्यायचे आहे. त्यानंतर त्यांच्या कार्यालयाकडून काम व्यवस्थित झाल्याची तपासणी करून नंतर ८ दिवसात संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करायचे आहे. पण प्रत्यक्षात ८ दिवसात पैसे जमा झाल्याचे उदाहरण क्वचितच पहायला मिळत आहे.