फळझाडांची ७५ हजार रोपे उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 11:19 PM2019-05-06T23:19:54+5:302019-05-06T23:20:43+5:30
फळशेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभागाच्या रोपवाटीकांमधून सवलतीच्या दरात रोपटे उपलब्ध करून दिली जातात. पुढील पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातील पाच शासकीय रोपवाटीकांमध्ये सुमारे ७४ हजार ७०८ रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : फळशेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभागाच्या रोपवाटीकांमधून सवलतीच्या दरात रोपटे उपलब्ध करून दिली जातात. पुढील पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातील पाच शासकीय रोपवाटीकांमध्ये सुमारे ७४ हजार ७०८ रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. ज्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी धानाची लागवड फायदेशिर ठरते. मात्र काही शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. अशा शेतात फळझाडांची लागवड केल्यास पडीक असलेली जमीन पिकाखाली येण्यास मदत होते. विशेष म्हणजे यातून शेतकºयाला अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्यास मदत होते.
जिल्ह्यातील शेतजमीन व वातावरण आंबा, काजू, चिकू, पेरू, आवळा, सीताफळ, फणस, चिंच, कागदी लिंबू, शेवगा, करवंद आदी फळझाडांसाठी योग्य आहे. काही नागरिक आपल्या घरी या झाडांची लागवड करतात. त्याला चांगली फळे येतात. याच झाडांची बागेत लागवड केल्यास शेतकºयाला उत्पन्न मिळण्यास मदत होते. फळशेती ही येथील शेतकऱ्यांसाठी अतिशय नवीन बाब आहे. त्यामुळे फळशेतीची रोपटे उपलब्ध होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील पाच रोपवाटीकांमध्ये फळझाडांची रोपे लावण्यात आली आहेत.
सदर रोपे पावसाळ्याच्या कालावधीत अत्यंत सवलतीच्या दरात शेतकºयांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सोनापूर येथील रोपवाटीकेत विविध फळझाडांची ८ हजार ९४१, वाकडी येथील रोपवाटीकेत २९ हजार ४५२, कृष्णनगर येथे १७ हजार ६४०, रामगड येथे ११ हजार २१५, कसनसूर येथील रोपवाटीकेत ६ हजार २७५ रोपे उपलब्ध आहेत. पाऊस पडल्यानंतर ही रोपे शेतकऱ्यांना सवलतीवर उपलब्ध होणार आहेत.
शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज
गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण फळपिकांसाठी लाभदायक असले तरी शेतकरी फळझाडांची लागवड करीत नाही. केवळ धानाची शेती केली जाते. पडिक जमिनीवर फळझाडांची लागवड झाल्यास शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. मात्र यासाठी शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र कृषी विभागाकडून शेतकºयांना मार्गदर्शन केले जात नाही. त्यामुळे शेतकरी फळबाग लागवडीची जोखीम उठविण्यास तयार होत नाही. विशेष म्हणजे फळबागेसाठी तारेचे कुंपन असणे आवश्यक आहे. या कुंपनासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. सदर तार अनुदानावर उपलब्ध झाल्यास शेतकरी फळशेतीकडे वळेल.