प्रासंगिक करारातून एसटीने कमावले ७७ लाख
By admin | Published: June 5, 2017 12:40 AM2017-06-05T00:40:48+5:302017-06-05T00:40:48+5:30
लाल डब्बा म्हणून अनेक वेळा चेष्ठेचा विषय होत असलेल्या एसटी बसपुढे खासगी प्रवासी वाहनांचे आव्हान दिवसेंदिवस वाढतच आहे.
यंदाची लग्नसराई : चार महिन्यात गेल्यावर्षीपेक्षा जास्त उत्पन्न
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लाल डब्बा म्हणून अनेक वेळा चेष्ठेचा विषय होत असलेल्या एसटी बसपुढे खासगी प्रवासी वाहनांचे आव्हान दिवसेंदिवस वाढतच आहे. लोकांकडे स्वत:च्या चारचाकी वाहनांची संख्याही वाढत आहे. असे असतानाही लग्नसराईसारख्या प्रसंगात एसटीच्या बसगाड्यांनाच प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात एसटी महामंडळाने ७७ लाख रुपये कमावले आहेत.
अपघातविरहित सेवेत राज्यात अव्वल असणाऱ्या गडचिरोली एसटी विभागाअंतर्गत गडचिरोली, ब्रह्मपुरी (जि.चंद्रपूर) आणि अहेरी असे तीन आगार येतात. एकूण २६० बसेसकरिता सध्याच्या घडीला विभागात ५० वाहक आणि ४० चालकांची कमतरता आहे. तरीही लग्नसराई, शाळेची सहल किंवा निवडणूक यासारख्या प्रासंगिक करारासाठी एसटी महामंडळ विनातक्रार सेवा देत आहे. यामुळेच महामंडळाची विश्वासार्हता कायम आहे. विशेष म्हणजे अलिकडे महामंडळाच्या बसेसमधील स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी प्रासंगिक करारांमध्ये वाढ झाली आहे.
गेल्यावर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात महामंडळाला प्रासंगिक करारातून ४३.६० लाखांचे उत्पन्न झाले होते. त्यात जानेवारी महिन्यात ८९ करारांमधून २० लाख ४४ हजार ७३३ रुपये, फेब्रुवारी महिन्यात ४६ करारांमधून ११ लाख १६ हजार रुपये, मार्च महिन्यात ८ करारांमधून ५ लाख ५२ हजार २२० रुपये आणि एप्रिल महिन्यात ३८ करारांमधून ६ लाख ६६ हजार ५३९ रुपये उत्पन्न मिळविले होते.
यावर्षी त्याच कालावधीत प्रासंगिक करारातून ७७ लाख रुपये मिळाले आहेत. त्यात जानेवारी महिन्यात ८९ करारांमधून १३ लाख ४८ हजार ७१९ रुपये, फेब्रुवारीत ८३ करारांमधून ५७ लाख ४ हजार २७० रुपये, मार्च महिन्यात ७ करारांमधून १ लाख ६० हजार ९८२ रुपये तर एप्रिल महिन्यात २२ करारांमधून ४ लाख ८८ हजार १४८ रुपये एवढे उत्पन्न झाले आहे.
महामंडळाच्या जुन्या ३ बाय २ सीटर बसगाड्या आता हद्दपार झाल्या आहेत. आता सर्व गाड्या २ बाय २ अशा ४८ आसणी आहेत. खासगी बसगाड्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी महामंडळाने केलेले हे परिवर्तन त्यांच्यासाठी फायद्याचे ठरत आहे.