आरमाेरीतील स्वीट मार्टमधून ७८ किलो तंबाखू व सिगारेट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:36 AM2021-04-10T04:36:24+5:302021-04-10T04:36:24+5:30
कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण लक्षात घेता राज्यासह जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन सुरु आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकल्यास कोरोना विषाणूचा ...
कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण लक्षात घेता राज्यासह जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन सुरु आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकल्यास कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे किराणा दुकानातून फक्त खाद्य पदार्थांची विक्री करण्यास परवानगी दिली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित व मृतक रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे पानठेले बंद ठेवण्याचे व किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत तंबाखूजन पदार्थांची विक्री सुरुच आहे.
आरमोरी शहरातील सद्गुरू स्वीट मार्टमधून तंबाखू विक्री होत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे नगरपरिषद, महसूल विभाग, पोलिस स्टेशन व मुक्तीपथने संयुक्तरित्या मोहीम राबवित त्या दुकानाची तपासणी केली. यावेळी दुकानात ७८ किलो तंबाखू व १ हजार २०० रुपयांच्या सिगारेट आढळून आल्या. संपूर्ण मुद्देमाल जप्त करीत दुकान मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पुन्हा तंबाखूची विक्री न करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा सदर दुकानदारावर तंबाखूजन्य पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मुख्याधिकारी हलामे, नायब तहसीलदार राठोड, पोलिस उपनिरीक्षक शिंदे, मुक्तिपथ तालुका संघटक यांच्या पथकाने केली.