‘गाेंडवाना’तील ७८ हजार विद्यार्थी यावर्षीही देणार ऑनलाइन परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:08 AM2021-03-04T05:08:34+5:302021-03-04T05:08:34+5:30
गडचिराेली : ऑनलाइन परीक्षेचा पहिला प्रयत्न गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात यशस्वी झाल्यानंतर गाेंडवाना विद्यापीठाने आता हिवाळी (अर्धवार्षिक) परीक्षाही ऑनलाइन ...
गडचिराेली : ऑनलाइन परीक्षेचा पहिला प्रयत्न गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात यशस्वी झाल्यानंतर गाेंडवाना विद्यापीठाने आता हिवाळी (अर्धवार्षिक) परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. शैक्षणिक सत्र २०२०-२१ मधील पहिल्या सत्राची (हिवाळी) परीक्षा पूर्णत: ऑनलाइन घेण्यासाठी महाविद्यालये सज्ज झाली आहेत. ४३७ विषयांचे एकूण ७८ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
येथील गाेंडवाना विद्यापीठाच्या वतीने गतवर्षीच्या शैक्षणिक सत्राच्या परीक्षा ऑक्टाेबर महिन्यात ऑनलाइन पद्धतीने यशस्वीरीत्या घेण्यात आल्या होत्या. इंटरनेट कनेक्टिव्हिटीची साेय नसलेल्या महाविद्यालयांच्या ठिकाणी ९ केंद्रांवर ऑफलाइन परीक्षेची व्यवस्था करण्यात आली हाेती. ८ मार्च २०२१ पासून सुरू हाेणाऱ्या हिवाळी २०२१ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या लाॅगिनवर या परीक्षेचे वेळापत्रक व त्यांचे हाॅल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न पद्धतीनुसार घेण्यात येणार आहे. ५ एप्रिलला शेवटचा पेपर होईल.
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका साेडविण्यासाठी एकूण ७५ मिनिटांचा अवधी देण्यात येणार आहे. एकूण ५० बहुपर्यायी प्रश्न असून, प्रत्येक गुणाला १ याप्रमाणे एकूण ५० गुणांचा पेपर राहील. चुकीच्या प्रश्नासाठी नकारार्थी गुण विद्यापीठाने ठेवले नाही. या परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना स्मार्ट फाेन, लॅपटाॅप, डेस्कटाॅप किंवा टॅबलेट आदींचा वापर करता येणार आहे. विद्यार्थ्यांना एकावेळी एकच प्रश्न दिसणार असून, या प्रश्नाचे उत्तर देता अथवा न देता पुढे जाता येईल. आधी साेडविलेले प्रश्न किंवा नंतर साेडविलेले प्रश्न बघता येणार नाहीत. तसेच प्रश्नपत्रिका डाऊनलाेडसुद्धा करता येणार नाही, असे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले.
८ मार्च ते ५ एप्रिल २०२१ दरम्यान या परीक्षेत कुठलीही अडचण येऊ नये, याकरिता महावितरण व बीएसएनएल कार्यालयाला पत्रव्यवहार करून अखंडित वीजपुरवठा व दूरसंचार सेवा पुरविण्याची सूचनाही विद्यापीठ प्रशासनाने केली आहे.
बाॅक्स ......
दुर्गम भागातील नऊ महाविद्यालयांची ऑनलाइनला पसंती
ऑक्टाेबर २०२० मध्ये या विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा घेतली, त्यावेळी इंटरनेटची सुविधा नसलेल्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन परीक्षेचा पर्याय दिला हाेता. त्यावेळी ९ महाविद्यालयांनी ऑफलाइन परीक्षा घेतली. मात्र, आता तीच ९ महाविद्यालये ऑनलाइन परीक्षा घेत आहेत. विद्यापीठाला तसे लेखी हमीपत्र त्यांनी लिहून दिले आहे. यामध्ये गडचिराेली तालुक्यातील मुलचेरा, काेरची, भामरागड तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश आहे. गडचिराेली जिल्ह्यातील भामरागड, मालेवाडा, काेरची, जारावंडी, वडधा तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील पाटण, जांभूळघाट, कनेरी अशा नऊ केंद्रांवर आता ऑनलाइनरीत्या परीक्षा हाेणार आहे.
बाॅक्स ...
ग्रामपंचायतीची वाय-फाय सुविधा वापरणार
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन परीक्षा याेग्यरीत्या पार पाडण्यासाठी महाविद्यालये सज्ज आहेत. दुर्गम व अतिदुर्गम भागात ग्रामपंचायतीची इंटरनेट वाय-फाय सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या आनुषंगाने विद्यापीठ प्रशासनाने जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जि. प. अध्यक्षांना विनंतीवजा पत्र लिहून सहकार्य मागितले आहे.