८ हजार ४७२ घरकुले अपूर्ण

By admin | Published: June 22, 2017 01:26 AM2017-06-22T01:26:48+5:302017-06-22T01:26:48+5:30

राज्य शासनाच्या वतीने गेल्या चार-पाच वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घरकूल मंजूर करण्यात येत आहेत.

8 thousand 472 houses are incomplete | ८ हजार ४७२ घरकुले अपूर्ण

८ हजार ४७२ घरकुले अपूर्ण

Next

आवासच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचण : १२०० घरकुलांचे लाभार्थी अनुदानापासून वंचित
दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य शासनाच्या वतीने गेल्या चार-पाच वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घरकूल मंजूर करण्यात येत आहेत. मात्र ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ अशी परिस्थिती आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सन २०१२-१३ ते २०१५-१६ या चार वर्षाच्या कालावधीतील मंजूर झालेले तब्बल ८ हजार ४७२ घरकुले अद्यापही अपूर्ण स्थितीत आहेत. ‘आवास’च्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचण असल्याने घरकुलाचे बांधकाम पूर्ण करूनही तब्बल १ हजार २७३ लाभार्थी घरकुलाच्या तिसऱ्या अनुदानापासून वंचित आहेत.

पूर्वीच्या आवास व आताच्या प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी पंचायत समिती व जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेमार्फत गडचिरोली जिल्ह्यात ग्राम पंचायत स्तरावर सुरू आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यात घरकूल बांधकामाच्या टप्प्यानुसार पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे अनुदान आॅनलाईन पद्धतीने वळते केले जाते. पहिल्या हप्त्याचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वळते झाल्यानंतर लाभार्थ्यांकडून घरकूल बांधकामाला गती दिली जाते. मात्र आवासच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल १ हजार २७३ लाभार्थी गेल्या चार वर्षांपासून तिसऱ्या हप्त्याच्या अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांसाठी आॅनलाईन वेतन प्रणाली डोकेदुखी ठरली आहे.
राज्यातील एकही गरीब व बीपीएलधारक सर्वसामान्य कुटुंब हक्काच्या घरापासून वंचित राहू नये, तसेच सर्वांना स्थायी स्वरूपाचा निवारा मिळावा, या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारने पूर्वी इंदिरा आवास व आता प्रधानमंत्री आवास योजना कार्यान्वित केली. मात्र आॅनलाईन वेतन प्रणालीत अनेक त्रुटी असल्याने लाभार्थ्यांना वेळेवर अनुदानाची रक्कम प्राप्त होत नाही. याचा परिणाम थेट घरकुलाच्या बांधकामावर होत आहे.
अनुदान वितरणाच्या प्रणालीतील या त्रुटींचा फटका केवळ गडचिरोलीच नाही तर इतरही जिल्ह्यांना बसत आहे.

मुंबईतील कार्यशाळेत सॉफ्टवेअरच्या अडचणींवर सकारात्मक चर्चा

विविध शासकीय योजनांमधून गडचिरोली जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेले हजारो घरकूल अपूर्ण असून अनेक लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात घरकुलाच्या बांधकामांना गती नाही. लाभार्थ्यांच्या अडचणी सोडवून घरकुलाच्या कामाला गती देण्याच्या उद्देशाने गडचिरोलीच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने २० ते २२ जून रोजी मुंबई येथील मंत्रालयात कार्यशाळा आयोजित केली होती. सदर कार्यशाळेला गडचिरोली येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जी.एम. दहीकर यांच्यासह बाराही पं. स. स्तरावरील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक व घरकूल योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी असणारे दोन कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेत सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे अडचणींवर विस्तृतपणे सकारात्मक चर्चा झाली.

बँकेत लाभार्थ्यांच्या चकरा कायमच
घरकुलाचे बांधकाम अर्ध्यापेक्षा अधिक केलेले, तसेच पूर्ण केलेले अनेक लाभार्थी अनुदानाची रक्कम आपल्या बँक खात्यात जमा झाली काय, याची खातरजमा करण्यासाठी बँकेत चकरा मारत आहेत. तीन ते चारदा जाऊनही दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे अनुदान सरकारकडून जमा करण्यात आले नसल्याचे बँक व्यवस्थापक वारंवार सांगतात. त्यामुळे शेकडो घरकूल लाभार्थी निराश होऊन परत जात आहेत.

 

Web Title: 8 thousand 472 houses are incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.