आरटीईच्या ८० टक्के जागा भरल्या; प्रवेशाला २३ जुलैपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:23 AM2021-07-12T04:23:36+5:302021-07-12T04:23:36+5:30
गडचिराेली : आरटीईअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के प्रवेश राखीव ठेवले जातात. ...
गडचिराेली : आरटीईअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के प्रवेश राखीव ठेवले जातात. या याेजनेंतर्गत गडचिराेली जिल्ह्यात आत्तापर्यंत ३७३ विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये प्रवेश झाले आहेत. एकूण जागांच्या तुलनेत ८० टक्के जागा भरण्यात आल्या असून २० टक्के प्रवेश शिल्लक आहेत.
गेल्या वर्षभरापासून काेराेना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे गडचिराेली जिल्ह्यातील प्राथमिक शाळा बंद आहेत. असे असतानासुद्धा पालकांचा आरटीईअंतर्गत माेफत प्रवेशाकडे कल वाढला आहे. या याेजनेच्या माध्यमातून दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना संधी मिळत आहे.
बाॅक्स ........आठ विद्यार्थ्यांचे प्रवेश केले रद्द
माेफत व सक्तीच्या शिक्षक हक्क कायद्यानुसार पहिल्या वर्गाच्या २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. या जागांवर लाॅटरी पद्धतीने निवड झाली. शाळांमध्ये प्रवेश झाले. मात्र, निवासी पुराव्याच्या कारणावरून शहरातील शाळांमधील आठ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
शहरात आरटीईअंतर्गत निवडलेल्या अनेक शाळा इयत्ता चाैथीपर्यंतच आहेत. चाैथी वर्ग उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीमध्ये माेफत प्रवेश मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. यात शासनाचे धाेरण कारणीभूत आहे.
बाॅक्स .....
दुसऱ्यांदा मिळाली मुदतवाढ
काेराेनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेस यावर्षी विलंब झाला. दरम्यान, राज्य शासनाने या प्रवेश प्रक्रियेला आधी ९ जुलैपर्यंत मुदत दिली हाेती. मात्र, अडचणींमुळे १०० टक्के जागा भरल्या नाहीत. या जागा भरण्यासाठी शासनाने दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. २३ जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
काेट ......
शाळांचे पैसे सरकार कधी देणार?
आरटीईअंतर्गत आमच्या शाळेत २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. मात्र, शुल्कापाेटी शासनाकडून मिळणारी रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जात आहे. अजूनही पैसे शिल्लक आहेत. त्यामुळे आर्थिक अडचण जाणवत आहे.
- सी. के. कांबळे, संस्थाध्यक्ष, घाेट.
काेट ......
माझ्या मुलाचा आरटीई प्रवेशासाठी लाॅटरी पद्धतीने नंबर लागला. मात्र, काॅम्प्लेक्स परिसरातील दूरची शाळा मिळाल्याने आपण प्रवेश घेतला नाही. कारण प्रवास खर्च लागताे.
- विनाेद लभाने, पालक.
काेट .....
काेराेना संकटामुळे यावर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला आहे. शासनाने आता २३ जुलैपर्यंत प्रवेश घेण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. जवळपास ८० टक्के प्रवेश झाले असून उर्वरित २० टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश २२ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येतील.
- हेमलता परसा, शिक्षणाधिकारी (प्राथ.).
जि. प. गडचिराेली.