कोरची तालुक्यात जंगली हत्तींचा उच्छाद; ८० वर्षीय वृद्ध महिलेला सोंडेत उचलून फेकले
By मनोज ताजने | Published: October 21, 2022 02:23 PM2022-10-21T14:23:28+5:302022-10-21T14:24:16+5:30
लेकुरबोडी गावातील घरांसह शेतातील पिकांचे नुकसान
कोरची (गडचिरोली) : तालुक्यात जंगली हत्तींच्या कळपाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील लेकुरबोडी गावात एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला हत्तीने सोंडेने उचलून फेकल्यामुळे ती महिला गंभीर जखमी झाली. यासोबतच एका घरासह शेतातील उभ्या पिकांचे नुकसान केले आहे.
गेल्यावर्षी छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करत धुमाकूळ घालणाऱ्या या हत्तींनी मधल्या काही काळात माघारी फिरून छत्तीसगड गाठले होते. पण जवळपास दोन महिन्यांपूर्वी पुन्हा हे हत्ती गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाले. धानोरा, देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घातल्यानंतर त्यांनी गोंदिया जिल्ह्यात प्रवेश केला होता. त्यानंतर आठवडाभरापासून कुरखेडा तालुक्याच्या सीमावर्ती भागात फिरून त्यांनी आता कोरची तालुक्यात धुमाकूळ सुरू केला आहे.
शुक्रवारच्या पहाटे लेकुरबोडी येथील घरांसह शेतातील पीकांची नासधूस करून एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला सोंडेने उचलून फेकले. त्यामुळे त्या महिलेची कंबर मोडली. शिवाय हातालाही जबर मार लागला आहे. शुक्रवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. सनकुबाई कोलुराम नरेटी (८०) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. तिला सकाळी ७:३० वाजता कोरची ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. डॉ.राहुल राऊत यांनी प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले.
सावधानता बाळगण्याचे आवाहन
गोंदिया जिल्ह्यातून परत आलेल्या या हत्तींनी पुन्हा छत्तीसगडच्या दिशेने आगेकुच केली आहे. पण वाटत कोरची तालुक्यातील मसेली परिसरातील लेकुरबोडी गावात नरेटी यांच्या घराची व घरातील धान्याची नासधूस केली. त्या घरात खाटेवर झोपून असलेल्या सनकुबाई कोलुराम नरेटी या वृद्ध महिलेला हत्तीने आपल्या सोंडेने उचलून फेकले. हे हत्ती गावापासून सहा-सात किलोमीटरच्या जंगलात आहेत. बेळगावचे वनपरिक्षेत्राधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे आपल्या चमुसह लेकुरबोडी व मसेली गाव परिसरात नागरिकांना सतर्क करीत असून हत्तीपासून दूर आणि सावध राहण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.