८०० स्पर्धक करणार पाच प्रकारच्या कलांचे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 06:00 AM2019-11-29T06:00:00+5:302019-11-29T06:00:26+5:30

विद्यापीठाचे कुलपती या नात्याने राज्यपालांनी सदर महोत्सव घेण्याची संधी गोंडवाना विद्यापीठाला दिली आहे. २ ते ५ डिसेंबरपर्यंत विविध स्पर्धांचे सादरीकरण चालणार असून दि.६ ला बक्षीस वितरण व समारोप होणार आहे. संपूर्ण राज्यातील २० विद्यापीठांमधील सळसळती तरुणाई आपल्या कलांचे सप्तरंग विद्यापीठाच्या प्रांगणात उधळणार आहे.

800 Competitors will present five types of art | ८०० स्पर्धक करणार पाच प्रकारच्या कलांचे सादरीकरण

८०० स्पर्धक करणार पाच प्रकारच्या कलांचे सादरीकरण

Next
ठळक मुद्देजिल्हावासीयांसाठी सांस्कृतिक मेजवाणी : चार मंचांवर एकाचवेळी रंगणार २६ स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या ८ वर्षांच्या कार्यकाळात प्रथमच राज्यस्तरिय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०१९’चे आयोजन करण्याचा बहुमान यावर्षी गोंडवाना विद्यापीठाला मिळाला आहे. यात राज्यभरातील ८०० स्पर्धक पाच प्रकारच्या कलाप्रकारातील २६ स्पर्धांमध्ये आपले सादरीकरण करणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर यांनी गुरूवारी पत्रकारांना दिली.
विद्यापीठाचे कुलपती या नात्याने राज्यपालांनी सदर महोत्सव घेण्याची संधी गोंडवाना विद्यापीठाला दिली आहे. २ ते ५ डिसेंबरपर्यंत विविध स्पर्धांचे सादरीकरण चालणार असून दि.६ ला बक्षीस वितरण व समारोप होणार आहे. संपूर्ण राज्यातील २० विद्यापीठांमधील सळसळती तरुणाई आपल्या कलांचे सप्तरंग विद्यापीठाच्या प्रांगणात उधळणार आहे.
यानिमित्ताने गोंडवन संस्कृतीचा स्रेहबंध अवघ्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीशी एकरूप होताना बघायला मिळणार आहे.
या पत्रपरिषदेला प्र-कुलगुरू डॉ.सी.व्ही.भुसारी यांच्यासह सहसंयोजक प्रा.प्रिती पाटील, प्रसिद्धी समितीचे प्रा.नरेंद्र आरेकर, प्रा.शशिकांत गेडाम, प्रा.धनराज खानोरकर, उपकुलसचिव डॉ.गोविंद दुबे, प्रा.अनिरूद्ध गचके, प्रा.शिंदे आदी उपस्थित होते.

झाडीपट्टीच्या कलावंत व प्रेक्षकांसाठी पर्वणी
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यातील इतर कलागुणांना वाव देण्यासाठी ‘इंद्रधनुष्य’चे आयोजन केले जाते. गोंडवानासारख्या मागास भागातील विद्यापीठाला हा बहुमान राज्यपालांनी दिला तो सार्थ ठरविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या झाडीपट्टी रंगभूमीच्या कलावंतांसाठी या महोत्सवातून काही नवीन गोष्टी शिकायला मिळेल, शिवाय येथील प्रेक्षकांसाठी हा महोत्सव एक पर्वणी ठरेल, असा विश्वास यावेळी कुलगुरू डॉ.कल्याणकर यांनी व्यक्त केला.

विविध कला स्पर्धां ठरणार आकर्षक
संगीत, नाटक, साहित्य, नृत्य व ललित कला या पाच प्रकारातील २६ कलांच्या सादरीकरण व स्पर्धेचे चार दिवस विद्यापीठाच्या प्रांगणात एकाचवेळी सुरू राहणार आहे. त्यात प्रामुख्याने शास्त्रीय गायन, तालवाद्य, सूरवाद्य, आदिवासी नृत्य, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व, वादविवाद, एकांकिका, प्रहसन, मूक अभिनय, नकला, चित्रकला, पोस्टर मेकिंग, मातीकला, व्यंगचित्रे, रांगोळी, स्पॉट फोटोग्राफी अशा विविध कला प्रकारांचा समावेश आहे. या स्पर्धांचे एकाचवेळी वेगवेगळ्या मंचावर सादरीकरण होणार असून ४ स्वतंत्र शामियाने उभारले जात आहेत. स्पर्धांच्या परीक्षणासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा निरीक्षक राहणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले व कार्यक्रमाच्या संयोजन सचिव डॉ.प्रिया गेडाम यांनी दिली.

Web Title: 800 Competitors will present five types of art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.