८०.६० लाखांचे अग्निशमन वाहन कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:25 AM2018-02-08T00:25:50+5:302018-02-08T00:27:04+5:30
नगर पंचायतीला २०१६-१७ मध्ये जिल्हा नियोजन समितीकडून ८०.६० लाख रुपयांच्या निधीतून अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्यात आले. मात्र कुशल मनुष्यबळाअभावी येथील अग्निशमन यंत्रणेची अवस्था ‘चणे आहे पण दात नाही’ अशी झाली आहे.
ऑनलाईन लोकमत
अहेरी : नगर पंचायतीला २०१६-१७ मध्ये जिल्हा नियोजन समितीकडून ८०.६० लाख रुपयांच्या निधीतून अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्यात आले. मात्र कुशल मनुष्यबळाअभावी येथील अग्निशमन यंत्रणेची अवस्था ‘चणे आहे पण दात नाही’ अशी झाली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे हे वाहन उभ्या उभ्याच सडणार का? असा प्रश्न नगरवासीय विचारत आहेत.
५ फेब्रुवारीला अहेरी उपजिल्हा रु ग्णालयाला मोठी आग लागून ५० लाखांपेक्षा जास्त किमतीचे साहित्य जळाले. मात्र ही आग विझविण्यासाठी अग्निशमन वाहनाचा कोणताही उपयोग झाला नाही. शहरात तसेच तालुक्यात आजपर्यंत आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण अग्निशमन वाहन आल्यानंतरही त्या आगी विजविण्यासाठी या वाहनाचा कोणताही उपयोग झाला नाही. आतापर्यंत केवळ एकदाच अहेरीपासून ७ किमी अंतरावर असलेल्या महागाव या गावी शेतात लागलेली आग विझविण्यासाठी हे वाहन गेले. नगर पंचायतच्या या अग्निशमन वाहनाला चालकच नाही. एवढेच नाही तर आग विझविण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारीही नाही. वाहन देताना कंपनीने जी प्राथमिक माहिती कर्मचऱ्यांना दिली त्याच्या जोरावर दिवस काढले जात आहेत. सदर वाहन व्यवस्थित चालवण्यासाठी फायरमन, लिडिंग फायरमन व वाहनचालक अशा कमीत कमी आठ जणांची टीम असणे गरजेचे आहे. त्यात महत्वाचं म्हणजे फायर स्टेशन असणे आवश्यक आहे. लोक त्याच ठिकाणी फोन करून अग्निशमन वाहन मागवू शकतील. पण ते नसल्याने हे वाहन पांढरा हत्ती झाले आहे.
यंत्रणेची अशीही उदासीनता
अहेरी नगर पंचायतीला २२ आॅगस्ट २०२७ रोजी अग्निशमन वाहन आले. परंतु तत्पूर्वी नगर पंचायतने प्रशासकीय मान्यता घेताना प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी केली. त्यानंतर ४ आॅक्टोबर व २९ डिसेंबर २०१७ तसेच ३ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी व आयुक्त तथा संचालक नगर प्रशासन मुंबई यांना पत्रव्यवहार केला. पण अजूनपर्यत प्रशिक्षित मनुष्यबळासाठी कोणतेही नियोजन अद्याप करण्यात आले नाही.