८२० वीज खांब बदलणार

By admin | Published: July 22, 2016 01:14 AM2016-07-22T01:14:09+5:302016-07-22T01:14:09+5:30

मोडकळीस व जीर्ण झालेले जिल्हाभरातील सुमारे ८२० वीज खांब बदलविण्याचे नियोजन वीज विभागाने केले असून त्यापैकी आजपर्यंत १४३ खांब बदलविण्यात आले आहेत.

820 power pillars will change | ८२० वीज खांब बदलणार

८२० वीज खांब बदलणार

Next

गडचिरोली : मोडकळीस व जीर्ण झालेले जिल्हाभरातील सुमारे ८२० वीज खांब बदलविण्याचे नियोजन वीज विभागाने केले असून त्यापैकी आजपर्यंत १४३ खांब बदलविण्यात आले आहेत. इतर खांब बदलविण्याची तयारी सुरू आहे. वीज खांब बदलविल्याने होणारा धोका काही प्रमाणात टळला असला तरी अजूनही हजारो खांब जीर्ण अवस्थेत ग्रामीण भागात दिसून येतात. सदर खांब बदलविण्याची तत्काळ कार्यवाही करणे आवश्यक झाले आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या बहुतांश भागाला चंद्रपूर जिल्ह्यातून वीज पुरवठा केला जातो. वीज पुरवठा करण्याचे एकमेव माध्यम खांब व वीज तारा आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा ग्रामीण भाग २० ते ३० वर्षांपूर्वी विद्युतने जोडण्यात आला आहे. काळाच्या ओघात लोखंडी खांब जमिनीजवळ गंजले आहेत. तर सिमेंट खांबांचीही कार्यक्षमता कमी झाल्याने तेही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातून असे धोकादायक खांब बदलविण्याच्या हजारो तक्रारी वीज विभागाकडे प्राप्त होतात. वीज विभागाने अतिशय धोकादायक असलेले जिल्हाभरातील सुमारे ८२० खांब बदलविण्याचे नियोजन वीज विभागाने केले आहे. यामध्ये उच्चदाब वाहिनी व लघुदाब वाहिनीवरील खांबांचा समावेश आहे. गडचिरोली डिव्हीजनमध्ये येणाऱ्या गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा, कोरची या सहा तालुक्यातील सुमारे १४३ खांब बदलविण्यात आले आहेत. तर आलापल्ली विभागाअंतर्गत येणाऱ्या चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी या सहा तालुक्यातील केवळ दोनच खांब बदलविले असून ६६५ खांब बदलविणे शिल्लक आहेत.
बहुतांश गावांमध्ये ३० ते ४० वर्षांपूर्वी वीज आली आहे. ३० ते ४० वर्षांत लोखंडी वीज खांब गंजून खालून त्याला ठिकठिकाणी छिद्र पडतात. त्यामुळे ते केव्हाही कोसळण्याची शक्यता राहते. परिणामी सदर खांब बदलविणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीच्या मार्फतीने तसेच सामान्य नागरिकही तालुकास्तरावरील वीज कंपनीच्या कार्यालयात याबाबत तक्रार दाखल करतात. तक्रारीची दखल घेऊन वीज खांब बदलविल्यास वीज कंपनीला १० हजारपेक्षा अधिक खांबांची गरज भासेल. मात्र वीज खांब उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत वीज विभाग सदर खांब बदलविण्यास टाळाटाळ करते. परिणामी आजही ग्रामीण भागात अशा प्रकारचे हजारो धोकादायक खांब दिसून येतात. सदर खांब बदलविणे अत्यंत आवश्यक झाले आहे. यासाठी वीज विभागने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)

जंगल भागातून भूमिगत केबलने वीज पुरवठ्याची मागणी
गडचिरोली जिल्ह्यातील ५० टक्के गावे दुर्गम भागात वसली आहेत. या गावांमध्ये वीज पुरवठा करण्यात आला आहे. वीज विभागाने कितीही नियोजन केले तरी पावसाळ्यादरम्यान एखादे झाड कोसळून वीज पुरवठा खंडित होतो. सदर वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यास १५ ते २० दिवस लागतात व तोपर्यंत सदर गाव किंवा परिसर अंधारातच राहतो. यावर एकमेव उपाय म्हणजे अशा गावांना फोनलाईनप्रमाणेच भूमीगत केबल टाकून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र अजूनपर्यंततरी वीज विभागाने याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे दुर्गम भागातील गावांचा वीज पुरवठा एमएसईबीने कितीने चांगले नियोजन केले तरी खंडित होणारच आहे.

४६३ किमीवरील फाद्यांची छाटणी
गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश विद्युत लाईन जंगलातून गेली आहे. त्यामुळे दरवर्षी वीज तारेजवळ येणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडाव्या लागतात. ही गडचिरोली जिल्ह्यातील अतिशय गंभीर बाब आहे. झाडांच्या फांद्या न तोडल्यास त्या वीज तारांमध्ये शिरून स्पार्र्किंग होण्याचा धोका राहतो. त्याचबरोबर त्याच वीज तारांचा प्रवाह झाडाच्या बुंद्यापर्यंत आल्यास मानवाला वीज शॉक लागण्याचा धोका आहे किंवा वीज पुरवठा वेळोवेळी स्ट्रिपही होतो. त्यामुळे वीज विभागाच्या मार्फतीने पावसाळ्यापूर्वी दरवर्षी वीज तारेजवळील फांद्या तोडल्या जातात. यावर्षी सुमारे ४६३ किमीवरील फांद्या तोडल्या आहेत. यामध्ये गडचिरोली विभागातील १८३ किमीवरील ३३ केव्ही लाईनच्या जवळील फांद्या तोडल्या आहेत. ११ केव्ही लाईनजवळील २०० किमी अंतरावरील व लघु वाहिनीवरील ४० किमी अंतरावरील फांद्या तोडल्या आहेत. तर आलापल्ली विभागातील ४० किमीवरील फांद्या तोडल्या आहेत.

३७९ इन्सुलेटर बदलविले
वीज तारावर असलेला प्रवाह वीज खांबापर्यंत पोहचू न देण्याचे महत्त्वाचे काम पीन इन्सुलेटर करत असते. त्यामुळे पीन इन्सुलेटर सुस्थितीत असणे अत्यंत आवश्यक आहे. वीज विभागाने एकूण ३७९ पीन इन्सुलेटर बदलविले आहेत. यामध्ये गडचिरोली विभागातील ३०४ व आलापल्ली विभागातील ७५ इन्सुलेटरचा समावेश आहे.

 

Web Title: 820 power pillars will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.