वडधम पार्कसाठी देणार ८४ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2017 01:37 AM2017-05-20T01:37:33+5:302017-05-20T01:37:33+5:30

सिरोंचा तालुक्यातील वडधम येथे दोन वर्षांपूर्वी खोदकाम करताना डायनासोरचे जीवाश्म आढळून आले होते.

84 lakh fund for Vadadham Park | वडधम पार्कसाठी देणार ८४ लाखांचा निधी

वडधम पार्कसाठी देणार ८४ लाखांचा निधी

Next

सोयीसुविधांची निर्मिती होणार : दोन वर्षांपूर्वी डायनासोरचे जीवाश्म आढळले
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील वडधम येथे दोन वर्षांपूर्वी खोदकाम करताना डायनासोरचे जीवाश्म आढळून आले होते. या जिवाश्मांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने या स्थळाचा विकास करण्यासाठी शासनाने ८३ लाख ७५ हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
सिरोंचा तालुक्यातील वडधम गावाजवळ दोन वर्षांपूर्वी बगीचा तयार करण्यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमीन सपाटीकरणाचे काम करण्यात येत होते. दरम्यान या ठिकाणी डायनासोरचे जीवाश्म आढळून आले होते. यापूर्वी १९४७ मध्ये याच ठिकाणी खोदकाम करण्यात आले होते. त्यावेळीसुद्धा जिवाश्म आढळून आले होते. ते जिवाश्म कोलकाता येथील प्रयोगशाळेत ठेवण्यात आले आहेत. दोन वर्षांपूर्वी सापडलेले जिवाश्म वडधम येथेच ठेवण्यात आले आहेत. वडधम येथे जीवाश्म आढळल्यापासून या ठिकाणी भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वनपर्यटनासोबतच जीवाश्मांचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून अनेक संशोधक या ठिकाणी येत आहेत. मात्र सिरोंचा तालुक्याच्या टोकावर असलेल्या वडधम येथे पर्यटकांसाठी कोणत्याच सोयीसुविधा नाही. त्यामुळे एक रात्रही या ठिकाणी थांबणे कठीण होते. जे जीवाश्म आढळून आले, त्यांची देखभाल योग्य पद्धतीने घेण्यात आली नाही तर ते ही नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या ठिकाणाचा विकास करण्याच्या उद्देशाने महसूल व वन विभागाने सुमारे ८३ लाख ७५ हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सदर निधी उपलब्ध झाल्यास या ठिकाणी सोयीसुविधा होऊन पर्यटकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा केली जात आहे. जाहिरातीच्या माध्यमातून या ठिकाणाचा प्रचार केला जाईल.

या सुविधा निर्माण होणार
वडधम येथील जीवाश्म पार्कसाठी शासनाने एकूण ८३ लाख ७५ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. यामधून जीवाश्म अवशेष, शिक्षण केंद्र निर्मितीसाठी ४० लाख रूपये खर्च केले जाणार आहेत. ५ लाखांच्या ५ फॉसिल रिपलिका, पाण्याची टाकी, पाईपलाईन, ३ वॉटर स्टँड निर्माण केले जाणार आहेत. रस्ता दुरूस्तीसाठी ४ लाख रूपये खर्च केले जातील. ३ रिटेनिंग व्हॉल्व, सोलरयुक्त बोअरवेल सिस्टीम, माहितीदर्शक सूचना फलक, प्रजातीनुसार रोपे, प्रसाधनगृह, सोलर लाईट, तिकीट घराची दुरूस्ती आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. जनजागृतीवर सुमारे २ लाख रूपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.

 

Web Title: 84 lakh fund for Vadadham Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.