आदिवासी आश्रमशाळेच्या ८४ विद्यार्थ्यांना जबरीने पाठविले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 06:00 AM2020-03-16T06:00:00+5:302020-03-16T06:00:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : राज्य सरकारने कोरोना व्हायरसचा फैलाव टाळण्यासाठी शहरी भागातील शाळा -कॉलेज ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य सरकारने कोरोना व्हायरसचा फैलाव टाळण्यासाठी शहरी भागातील शाळा-कॉलेज ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर नागपुरातील आदर्श संस्कार इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेने गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील ८४ आदिवासी विद्यार्थ्यांना रविवारी संध्याकाळी जबरीने गडचिरोलीत आणून सोडले. विशेष म्हणजे आदिवासी प्रकल्प कार्यालयाने कोणतेही निर्देश दिले नसताना आदिवासी विद्यार्थ्यांना या पद्धतीने गावाकडे पाठविण्याचा प्रकार पाहून या विभागाचे स्थानिक अधिकारीही चक्रावून गेले.
दरम्यान गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी यांनी तिथे पोहोचून वस्तुस्थिती जाणून घेत विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासोबतच त्यांची व पालकांची निवास व भोजन व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये शासकीय खर्चाने प्रवेश योजनेअंतर्गत नागपुरातील श्रीकृष्ण नगर (पिपला) येथील आदर्श संस्कार इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गात गडचिरोली जिल्ह्यातील ८४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शासनाने ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा आदेश काढल्यानंतर रविवारी सदर शाळेच्या व्यवस्थापनाने सर्व विद्यार्थ्यांना तातडीने त्यांच्या स्वगावी पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्वांना गडचिरोलीच्या एमआयडीसी भागातील इंदाळा-पारडी मार्गावर सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास शाळेच्या वाहनांनी आणून सोडले. हे करताना त्यांच्या दुर्गम भागातील पालकांना गडचिरोलीत येऊन पाल्यांना घेऊन जाण्यासाठी सांगितले. शाळेच्या वॉर्डनने विद्यार्थ्यांना पालकांकडे सोपविताना ‘आम्ही पाल्याला स्वेच्छेने घरी घेऊन जात असून त्याची प्रकृती चांगली आहे’ असे आपल्या रजिस्टरवर लिहून घेतले. पण काही जागरूक पालकांनी यावर आक्षेप घेतला. शाळा व्यवस्थापन आपली जबाबदारी झटकत असल्याची बाब त्यांनी गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी यांच्या कानावर टाकली. डॉ.होळी यांनी विद्यार्थ्यांना ठेवले ते ठिकाण गाठून या प्रकाराची माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना दिली.
दरम्यान गडचिरोलीचे सहायक प्रकल्प अधिकारी विलास राचेलवार हेसुद्धा तिथे पोहोचले. शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवले पण आम्हाला ही बाब का कळविली नाही, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
दरम्यान सायंकाळी दुर्गम भागातील गावांमध्ये जाणे शक्य नसल्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांना गडचिरोलीतील शासकीय आदिवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ठेवून त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. सर्वांची वैद्यकीय तपासणीही केली जाणार असल्याचे एपीओ राचेलवार यांनी सांगितले.
‘त्या’ शाळेच्या व्यवस्थापनावर कारवाई करा
भामरागडपासून कोरचीपर्यंतच्या दुर्गम भागातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांना नागपुरातून आणून गडचिरोलीत जबरीने सोडून देणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या बेजबाबदार शाळा व्यवस्थापनावर आणि त्याला पाठबळ देणाºया आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आपण शासनाकडे करणार असल्याचे आ.डॉ.होळी यांनी सांगितले.
सदर शाळेच्या व्यवस्थापनाने मुलांना अशा पद्धतीने त्यांच्या गावी पाठविण्यासंदर्भात आपल्याकडे परवानगी घेतलेली नव्हती. पण प्रकल्प अधिकाऱ्यांशी त्यांचे बोलणे झाले होते. यात नेमका कोणाचा दोष आहे हे तपासून पाहिले जाईल, असे आदिवासी विकास विभागाच्या नागपूर विभागाचे सहायक आयुक्त डॉ.संदीप राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.