वैद्यकीय महाविद्यालयात ८५ जागा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 02:15 PM2024-10-10T14:15:35+5:302024-10-10T14:17:09+5:30

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन : आजी, माजी खासदारांची उपस्थिती

85 seats reserved for Maharashtra students in medical college | वैद्यकीय महाविद्यालयात ८५ जागा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव

85 seats reserved for Maharashtra students in medical college

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली:
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उ‌द्घाटन ऑनलाइन पद्धतीने ९ ऑक्टोबर रोजी पार पडले. दरम्यान, १०० पैकी ८५ जागा महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी राखीव असणार असून, उर्वरित १५ जागांवरील प्रवेश भारतातील विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील. सर्व प्रवेश गुणवत्तेनुसार मिळणार आहेत.


या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हा नियोजन भवनात करण्यात आले होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी तथा जि.प. सीईओ आयुषी सिंह, खासदार डॉ. नामदेव किरसान, माजी खासदार अशोक नेते, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, आदी उपस्थित होते. 


यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. एम.बी.बी.एस. प्रथम वर्ष अध्यापनासाठी नागपूर व चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांच्या सेवा गडचिरोली येथे वर्ग करण्यात आल्या असून, नियमित अध्यापनासाठी कोणतीही अडचण नसल्याचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे यांनी सांगितले. यावेळी जि.प. सीईओ आयुषी सिंह यांनी वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची संधी यानिमित्ताने विद्यार्थ्यांना आहे, असे सांगितले. यामुळे गडचिरोलीतील आरोग्यसेवेवरील ताण कमी होईल असेही त्या म्हणाल्या. 


खासदार म्हणाले, श्रेयवादापेक्षा विकास महत्त्वाचा 
१ दरम्यान, गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात या महाविद्यालयामुळे उत्तम डॉक्टर व आरोग्य व्यवस्था निर्माण होईल, असा विश्वास डॉ. नामदेव किरसान यांनी व्यक्त केला. भाजपमधील श्रेयवादावर भाष्य करताना ते म्हणाले, विकास ही निरंतर प्रक्रिया आहे. त्यामुळे कोणी एकाने श्रेय घेण्याचा विषय नाही. या कामात आता आमचीही मदत होणार आहे. मात्र, प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून हातभार लावायचा असतो, यातून जिल्ह्याचा विकास करायचा असतो, असे सांगायला ते विसरले नाहीत. महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीसाठी सर्वतोपरी सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले.


३ इमारती ताब्यात, रुग्णांची हेळसांड होण्याची शक्यता 
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सत्ताधाऱ्यांनी उद्घाटनची घाई केली, असा आरोप काँग्रेसने केला आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा रुग्णालयातील बीएस्सीच्या मुलांचे वसतिगृह, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह तसेच अन्य एक इमारत ताब्यात घेतली आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या यंत्रणेवर ताण येऊ शकतो. यातून रुग्णांची हेळसांड झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल युवक काँग्रेसचे प्रदेश सहसचिव कुणाल पेंदोरकर यांनी केला आहे.


८२ एकरवर उभारणार महाविद्यालय
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ८२ एकर जागा आरक्षित केली असून, लवकरच तेथे इमारत उभारली जाणार आहे. तूर्त जिल्हा रुग्णालयातच विद्यार्थ्यांना अध्ययन केले जाणार असून, आवश्यक त्या प्रयोगशाळा उभारण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: 85 seats reserved for Maharashtra students in medical college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.