८५१६ रूग्ण मलेरिया ‘पॉझिटिव्ह’
By admin | Published: November 19, 2014 10:38 PM2014-11-19T22:38:05+5:302014-11-19T22:38:05+5:30
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून मलेरियाने थैमान घातले आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व रूग्णालय रूग्णांनी हाऊसफुल असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे जानेवारी ते आॅक्टोबर २०१४
१० महिन्यांत : सर्वाधिक रूग्ण एटापल्ली व धानोरा तालुक्यात
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून मलेरियाने थैमान घातले आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व रूग्णालय रूग्णांनी हाऊसफुल असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे जानेवारी ते आॅक्टोबर २०१४ या दहा महिन्यात जिल्ह्यात तब्बल ८ हजार ५१६ रूग्ण मलेरिया पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
जिल्हा हिवताप कार्यालयाच्यावतीने हिवतापाच्या साथीला नियंत्रणात आणण्यासाठी वर्षभर कार्यक्रम राबविल्या जातो. मात्र गडचिरोली जिल्ह्यात जंगल, नदी, नाले, डबके आदींचे प्रमाण अधिक असल्याने जिल्ह्यातील वातावरण हिवतापाचे जंतू निर्माण करण्यासाठी अनुकूल असल्याचे समजले जाते. मात्र या जिल्ह्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा हिवताप कार्यालयाच्यावतीने बाराही तालुक्यात जानेवारी ते ३१ आॅक्टोबर २०१४ या कालावधीत ५ लाख २४ हजार ६७४ नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले. यापैकी ८ हजार ५१६ रूग्ण मलेरिया पॉझिटीव्ह आढळून आले. या रूग्णांमध्ये पीव्ही स्वरूपाचे १ हजार ३३३ तर पीएफ स्वरूपाचे ७ हजार १८३ रूग्णांचा समावेश आहे.
जानेवारी ते आॅक्टोबर २०१३ या कालावधीत जिल्हा हिवताप विभागाच्यावतीने एकूण ७२ हजार ३१८ रूग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले होते. यापैकी पीव्ही स्वरूपाचे १९१ व पीएफ स्वरूपाचे १ हजार ८३३ असे एकूण २ हजार २४ मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळले होते. त्यापूर्वी जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने एकूण ५३ हजार ६६४ रूग्णांचे रक्त नमुने घेऊन तपासणी करण्यात आली होती. यामध्ये पीव्ही स्वरूपाचे १२८, पीएफ स्वरूपाचे ३९२ असे एकूण ५२० पॉझिटीव्ह मलेरिया रूग्ण आढळून आले होते. या दोनही तपासणीच्या तुलनेत यंदा जानेवारी ते आॅक्टोबर २०१४ मध्ये मोठ्या प्रमाणात मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याने आरोग्य विभागालाही ही साथ आटोक्यात आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
जानेवारी ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत अहेरी तालुक्यातील एकूण ४० हजार ११३ रूग्णांचे रक्त नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. यात पीव्ही स्वरूपाचे १५७ व पीएफ स्वरूपाचे ७३० असे एकूण ८८७ मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. आरमोरी तालुक्यात ४० हजार ७६७ रक्त नमुन्यांमध्ये पीव्ही स्वरूपाचे २५ व पीएफ स्वरूपाचे ११९ असे एकूण १४४ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. एटापल्ली तालुक्यात ४२ हजार ९७३ नमुने घेण्यात आले. यापैकी पीव्ही स्वरूपाचे २५५ व पीएफ स्वरूपाचे १ हजार ७०२ असे एकूण १ हजार ९५७ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. भामरागड तालुक्यात २५ हजार ७९८ रक्त नमुन्याची तपासणी करण्यात आली. यात पीव्ही प्रकारचे १०० व पीएफ प्रकारचे १ हजार १२३ असे एकूण १ हजार २२३ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले.
चामोर्शी तालुक्यात ६९ हजार ३९ रक्त नमुन्यांपैकी पीव्ही प्रकारचे १४३ व पीएफ प्रकारचे ३२१ असे एकूण ४६४ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. धानोरा तालुक्यात ६९ हजार ७१७ नमुन्यांपैकी पीव्ही प्रकारचे १६७ व पीएफ प्रकारचे १ हजार ३६७ असे एकूण १ हजार ५३४ रूग्ण मलेरिया पॉझिटीव्ह आढळून आले. गडचिरोली तालुक्यात ५६ हजार ८८९ रक्त नमुने घेण्यात आले. यामध्ये पीव्ही प्रकारचे ९० व पीएफ प्रकारचे ३६५ असे एकूण ४५५ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. कोरची तालुक्यात ३० हजार ९६२ रक्त नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. यात पीव्ही प्रकारचे १२, पीएफ प्रकारचे २७९ असे एकूण २९१ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. कुरखेडा तालुक्यात ६० हजार ९८ रक्त नमुने घेण्यात आले. यामध्ये पीव्ही प्रकारचे ७३ व पीएफ प्रकारचे ४६२ असे एकूण ५३५ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले.
मुलचेरा तालुक्यात २४ हजार ६५४ रक्त नमुने घेण्यात आले. यामध्ये पीव्ही प्रकारचे ७४ व पीएफ प्रकारचे २६१ असे एकूण ३३५ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. सिरोंचा तालुक्यात ३८ हजार ६०३ रक्त नमुन्यांमध्ये पीव्ही प्रकारचे २२७ व पीएफ प्रकारचे ४३१ असे एकूण ६५८ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. देसाईगंज तालुक्यात ४३ हजार ५२९ रक्त नमुन्यांमध्ये पीव्ही प्रकारचे १० व पीएफ प्रकारचे २३ असे एकूण ३३ रूग्ण मलेरियाने पॉझिटीव्ह आढळून आले. मलेरियाच्या थैमानामुळे नागरिक भयभीतही झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)